Pune News : पुणे विमानतळाचा महत्त्वाचा टप्पा पार; मराठवाडा अन् दक्षिण महाराष्ट्राला मोठा दिलासा

पुणे विमानतळाने प्रादेशिक आणि राष्ट्रीय हवाई कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अजिंक्य धायगुडे पाटील, प्रतिनिधी

Pune News :  पुणे विमानतळाने प्रादेशिक आणि राष्ट्रीय हवाई कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. १५ अतिरिक्त फ्लाइट स्लॉट्सची वाढ करण्यात आली आहे. यामुळे विमानतळावरील एकूण स्लॉट्सची संख्या २२० वरून २३५ झाली आहे. या वाढीमुळे प्रवासी हालचाली अधिक सुलभ, जलद आणि कार्यक्षम होणार असून विमान कंपन्यांना अधिक उड्डाणे सुरू करण्यासाठी संधी उपलब्ध होणार आहे. नवीन स्लॉट्सच्या उपलब्धतेमुळे पुणे शहराला मंगळुरू, सोलापूर आणि बागडोगरा या नव्या हवाई मार्गांनी जोडले जाणार आहे. या नव्या मार्गांमुळे केवळ प्रवास सुलभ होणार नाही, तर पर्यटन, व्यापार, उद्योग आणि सेवा क्षेत्रालाही मोठी चालना मिळेल. विशेषतः सोलापूरसारख्या शहराला थेट हवाई जोडणी मिळाल्याने मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पुणे विमानतळावरील स्लॉट्सची वाढ

हा महत्त्वपूर्ण विकास केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे शक्य झाला आहे. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे पुणे विमानतळाच्या क्षमतेत वाढ होत असून शहराच्या वाढत्या हवाई प्रवासाच्या गरजांना समर्थपणे प्रतिसाद दिला जात आहे. या संदर्भात मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुणे विमानतळावरील स्लॉट्सची वाढ ही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची पायरी आहे. नवीन उड्डाणांमुळे उद्योग, आयटी, शिक्षण आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल. केंद्र सरकारच्या UDAN योजनेच्या माध्यमातून आम्ही दुर्गम आणि मध्यम शहरांनाही हवाई नकाशावर आणण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहोत.

Advertisement

नक्की वाचा - Pune News : आंबे सांभाळून ठेवा! पुण्यात आंबेचोरांचा सुळसुळाट; रात्रीच्या अंधारात 1 लाखांच्या पेट्या गायब

पुणे विमानतळ ‘रीजनल कनेक्टिव्हिटी स्कीम (RCS–UDAN)' अंतर्गत सध्या नांदेड, किशनगढ, सिंधुदुर्ग आणि जळगाव या महत्त्वाच्या शहरांशी जोडलेले आहे. या मार्गांमुळे शेवटच्या टप्प्यापर्यंत कनेक्टिव्हिटी मजबूत होत असून, संतुलित प्रादेशिक विकासाला गती मिळत आहे. तसेच, वाढत्या प्रवासी संख्येला लक्षात घेता विमानतळावर सुविधा उन्नत करण्याचे कामही सुरू आहे, ज्यामध्ये प्रवासी सोयी, सुरक्षा व्यवस्था आणि ऑपरेशनल क्षमता यामध्ये सातत्याने सुधारणा केली जात आहे. १ मे २०२६ पासून नव्याने सुरू होणाऱ्या उड्डाणांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, यामुळे पुणेकरांना अधिक पर्याय आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळणार आहे. पुणे विमानतळ प्रशासन भविष्यातही अधिक मार्ग, वाढीव उड्डाणे आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध असून, पुण्याला देशातील एक महत्त्वाचे एव्हिएशन आणि कनेक्टिव्हिटी हब बनवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.

Topics mentioned in this article