Pune Auto Driver Video : पुणं हे शिक्षणाचं आणि संस्कृतीचं माहेरघर मानलं जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून पुण्यातून गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर येत आहे. यामुळे पुण्यात राहणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेवरही सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान पुण्यातील एका इन्फुएन्सरने रिक्षा चालकाचा एक संतापजनक अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओच्या माध्यमातून पुण्यातील रिक्षाचालकांचं धक्कादायक कृत्य समोर आलं आहे.
तरुणीसोबत नेमकं काय घडलं?
रिमझिम नावाच्या तरुणीने इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिने दिल्यानुसार, ती आणि तिची मैत्रीण दुचाकीवरून जात असताना एक रिक्षाचालक त्यांच्याशी अतिशय अभद्र भाषेत बोलला आणि गैरवर्तन केलं. जेव्हा रिमझिमने त्याला विरोध केला आणि त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केले, तेव्हा तो अधिकच उद्धटपणे वागू लागला. या व्हिडिओमध्ये रिमझिम म्हणते की, पुण्यात घराबाहेर पडणे आता कठीण झाले आहे. रिक्षाचालक स्वतःच्या मनाप्रमाणे भाडे ठरवतात आणि जर त्यांना मीटरनुसार किंवा योग्य भाड्याने जाण्यास सांगितले, तर ते वाद घालतात. "तुमचे मनमानी दर चालणार नाहीत," असे ठणकावून सांगणाऱ्या रिमझिमला त्या चालकाच्या चुकीच्या देहबोलीचा आणि बोलण्याच्या पद्धतीचा सामना करावा लागला.
हा व्हिडिओ पोस्ट होताच पुण्यातील अनेक नागरिकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी कमेंट्समध्ये म्हटलं आहे की, काही रिक्षाचालकांना एका दिवसात श्रीमंत व्हायचं असतं, म्हणूनच ते प्रवाशांची लूट करतात. तर काहींनी शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. रिमझिमच्या या व्हिडिओमुळे पुण्यातील रिक्षाचालकांच्या 'अॅटिट्यूड'चा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने अशा मुजोर चालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.