Pune News: पुणेकरांना बसणार झटका? 1 ऑगस्टपासून रिक्षा प्रवास महागण्याची दाट शक्यता

Pune News: पुण्यात येत्या 1 ऑगस्टपासून रिक्षा प्रवास महागण्याची शक्यता आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून (RTA) पहिल्या १.५ किलोमीटरसाठीचे किमान भाडे 25 रुपयांवरून 30 रुपये करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune News: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील रिक्षाप्रवाशांच्या खिशाला लवकरच कात्री लागण्याची शक्यता आहे. सीएनजीच्या (CNG) दरात झालेल्या वाढीमुळे रिक्षाचालक संघटनांकडून भाडेवाढीची मागणी जोर धरत होती. या पार्श्वभूमीवर, येत्या 1 ऑगस्टपासून पुण्यातील रिक्षा भाड्यात सुधारणा करण्यास प्रादेशिक परिवहन प्राधिकरण मंजुरी देण्याची दाट शक्यता आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या आरटीएच्या बैठकीत यासंदर्भातील अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

भाड्यात नक्की किती रुपयांची वाढ होणार?

पुणे आरटीओ (RTO) अधिकारी आणि विविध रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन प्रस्तावानुसार भाडेदर खालीलप्रमाणे वाढण्याची शक्यता आहे.

किमान भाडे (पहिले 1.5 किमी): सध्याच्या 25 रुपयांवरून थेट 30 रुपये केले जाण्याची शक्यता आहे.
पुढील प्रति किलोमीटर दर: सध्याच्या 17 रुपयांवरून 20 रुपये केला जाऊ शकतो.

Advertisement

(नक्की वाचा-  Kolhapur News: संत बाळूमामा ट्रस्टमध्ये 60 कोटींचा घोटाळा; तत्कालीन धर्मादाय निरीक्षकासह कंत्राटदारावर गुन्हा)

खाटुआ समितीच्या निकषानुसार वास्तविक भाडेवाढ याहून अधिक होऊ शकत होती. मात्र, नागरिकांवर अधिक ताण पडू नये म्हणून संघटनांनी पहिल्या 1.5 किमीसाठी 30 रुपये आणि पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 20 रुपयांचीच मागणी लावून धरली असल्याचे रिक्षा पंचायतीने सांगितले.

सीएनजी दरवाढीमुळे रिक्षा संघटना आक्रमक

पुण्यात सध्या सीएनजीचा दर 95.75 रुपये प्रति किलो वर पोहोचला आहे. जून महिन्याच्या मध्यावर सीएनजीचे दर वाढल्यानंतर भाडेवाढीच्या मागणीने गती घेतली आहे.  संघटनांच्या मागणीनुसार, 1 ऑगस्टपासून नवीन दर लागू झाल्यास त्यापूर्वी रिक्षांच्या मीटरचे फेरप्रमाणीकरण केले जाईल. तोपर्यंत प्रवाशांच्या सोयीसाठी आरटीओने नवीन भाडे कार्ड प्रसिद्ध करावे, अशी विनंतीही करण्यात आली आहे.
 


Topics mentioned in this article