Pune Nasrapur Case: नसरापूर चिमुरडी अत्याचार व हत्या प्रकरण, आरोपी भीमराव कांबळे दोषी, 29 जून शिक्षा सुनावणार

Pune Nasrapur Case: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे चिमुरडीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येप्रकरणी विशेष न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवलं असून निकाल 29 जूनपर्यंत राखून ठेवला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

यशपाल सोनकांबळे, पुणे

पुणे जिल्ह्यातील भोर जवळील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. या प्रकरणी शिक्षेची सुनावणी 29 जून रोजी सुनावली जाणार आहे. दुर्मीळातील दुर्मीळ हे प्रकरण असल्याचे न्यायालयाने म्हटलं आहे. 

प्रकरणाची सुनावणी अत्यंत जलद गतीने पार पडली. गुन्हा घडल्यापासून अवघ्या काही आठवड्यांतच तपास यंत्रणा आणि न्यायालयाने सर्व प्रक्रिया पूर्ण केली असून, आज नराधम भीमराव कांबळेला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. 

Advertisement

गुन्हा क्रूर, आमनवीय आणि अमानुष- न्यायाधीश

न्यायाधीश एस आर साळुंखे यांनी निकाल देताना म्हटलं की, "दुर्मिळातील दुर्मिळ असं हे प्रकरण आहे. आरोपी भीमराव कांबळेने केलेला गुन्हा क्रूर, आमनवीय आणि अमानुष आहे. पीडितेच्या अंगावरील जखमा, अत्याचार पाहता हा गुन्हा अमानवीय आहे."

"आरोपी यापूर्वीही दोन गुन्ह्यात दोषी आढळला होता. त्याला गावकऱ्यांनी हाकलून दिले आहे आणि कुटुंबातील कोणीही त्याच्या पाठीशी उभे राहिलेले नाही." न्यायाधीश साळुंखे यांनी शेवटी स्पष्ट केले की, "निष्पाप लहान मुलीच्या न्याय हक्कासाठी हा निकाल अत्यंत महत्त्वाचा आहे."

सुनावणीदरम्यान कोर्टामध्ये काय-काय घडले?

कामकाजाला सुरुवात होताच न्यायाधीशांनी आरोपी भीमराव कांबळे याला विचारले की, "ज्या ज्या आरोपांखाली तुला अटक करण्यात आली होती, ते सर्व आरोप न्यायालयात सिद्ध झाले आहेत. तुझ्यावर असलेले सर्व गुन्हे तुला वाचून दाखवण्यात आले आहेत."

न्यायाधीश पुढे म्हणाले, "या गुन्ह्याचे गांभीर्य पाहता तुला फाशीची शिक्षा सुनावण्यात येऊ शकते किंवा आजन्म कारावासही लागू शकतो. यामध्ये तुला कमीत कमी 20 वर्षे कारावासाची शिक्षा होऊ शकते."

सरकारी वकिलांचा युक्तीवाद

सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तीवाद करताना म्हटलं की,  "न्यायालयाला विनंती आहे की सर्व गुन्हे सिद्ध झाले आहेत. विविध गुन्ह्यात आजन्म कारावास, फाशीची शिक्षा लागू शकते. विविध बीएनएएसनुसार ही शिक्षा होऊ शकते. गुन्ह्यातील क्रौर्य आणि अत्याचार पाहता जास्तीत जास्त शिक्षा सुनावण्यात यावी."

Advertisement

"एकट्या आजीकडे ही मुलगी राहत असताना त्याने रेकी केली. तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून हत्या केली. त्याला कायद्याची भिती नव्हती. पूर्वीच्या गुन्ह्यात नात्यातील मुलगी आणि प्राण्यावर देखील अत्याचार केला. याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली पाहिजे. आजोबांच्या नजरेने विश्वासाने चिमुरडी त्यांच्यासमवेत गेली. गुन्ह्यानंतर त्याला पश्चात्ताप झालेला नाही हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे", असंही वकील मिसर यांनी म्हटलं.