Pune News: शालीमार एक्सप्रेसमध्ये अचानक घुसली ATS अन्...; पुण्यात बॉम्ब ठेवून पळणाऱ्या आरोपीचा असा झाला गेम!

Pune News: पुण्यातील एका प्रसिद्ध हॉस्पिटसमोर थेट जिवंत बॉम्ब ठेवल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती.

जाहिरात
Read Time: 3 mins
Pune News: दहशतवाद विरोधी पथकाने म्हणजेच एटीएसने अत्यंत नाट्यमय रित्या आरोपीला अटक केलीय.
पुणे:

Pune News: पुण्यातील एका प्रसिद्ध हॉस्पिटसमोर थेट जिवंत बॉम्ब ठेवल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. रुग्णांच्या आणि डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या या प्रकरणाचा छडा लावण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. हॉस्पिटलच्या परिसरात जिवंत बॉम्ब ठेवून पसार झालेल्या मुख्य आरोपीला दहशतवाद विरोधी पथकाने म्हणजेच एटीएसने अत्यंत नाट्यमय रित्या धावत्या ट्रेनमधून बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईमुळे पुणे शहरासह संपूर्ण राज्याने सुटकेचा श्वास सोडला आहे.

नेमकं काय घडलं?

हडपसर परिसरातील कामधेनु इस्टेट येथील उषा किरण हॉस्पिटलमध्ये २ दिवसांपूर्वी हा सगळा प्रकार घडला. सायंकाळी 7 वाजता या रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर एक बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आली. ही माहिती मिळताच रात्री 8 वाजता हडपसर पोलिसांना पाचारण करण्यात आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीएस) तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तपास केला असता तिथे जिलेटिनच्या कांड्या आणि टायमर लावलेला जिवंत बॉम्ब असल्याचे समोर आले.

Advertisement

बीडीएस पथकाने रात्री 8.30 वाजता हा बॉम्ब सुरक्षितरित्या रुग्णालयातून बाहेर काढला आणि हडपसरमधील पॅराग्लाइडिंग सेंटर मैदानात नेला. तिथे रात्री 9.30 वाजता हा बॉम्ब यशस्वीरित्या निकामी करण्यात आला. या घटनेनंतर हॉस्पिटलच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

( नक्की वाचा : NEET Paper Leak: बाप आरोपी अन् घरात 5-5 डॉक्टर; नीट पेपर लीक प्रकरणातील 'या' कुटुंबाचं धक्कादायक वास्तव )

धावत्या ट्रेनमधून आरोपी ताब्यात

या घटनेनंतर पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्थानिक पोलीस, पुणे शहर पोलीस आणि एटीएस पथकाद्वारे कसून तपास सुरू केला. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता बॉक्स घेऊन आलेली एक संशयास्पद व्यक्ती कॅमेऱ्यात कैद झाली होती. तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी या आरोपीचे नाव शिवाजी राठोड असल्याचे शोधून काढले. मूळचा सोलापूरचा असलेला हा आरोपी गुन्हा करून पळून गेला होता.

आरोपी शिवाजी राठोड हा ट्रेन क्रमांक 18029 शालीमार एक्सप्रेसने नागपूरच्या दिशेने जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मोबाईल लोकेशनच्या आधारे नागपूर एटीएस आणि पुणे एटीएसने संयुक्त सापळा रचला. ही ट्रेन वर्धा जिल्ह्यातील पुलगाव रेल्वे स्थानकावर पोहोचताच पोलिसांनी डब्यात प्रवेश करून आरोपी शिवाजी राठोडला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला नागपूर रेल्वे जंक्शन येथे उतरवण्यात आले.

( नक्की वाचा : Pune News: पुण्यात हॉटेलमध्ये जेवायला जाताय? आधी ही बातमी वाचा! QR कोड स्कॅन करताच तरुणीला थरारक अनुभव )
 

घर आणि दुकानावर एटीएसची मोठी छापेमारी

आरोपीला पकडण्यापूर्वी गुरुवार 14 मे रोजी सायंकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत एटीएस, फॉरेन्सिक टीम आणि बॉम्ब शोधक पथकाने आरोपी शिवाजी राठोड याच्या मांजरी बुद्रुक येथील अनाजी वस्तीतील घर आणि दुकानावर जोरदार छापेमारी केली. तब्बल 5 तास चाललेल्या या संयुक्त कारवाईत पोलिसांनी बॉम्ब तयार करण्यासाठी वापरलेली अवजारे आणि इतर महत्त्वाचे पुरावे हस्तगत केले आहेत. याशिवाय त्याच्या घर आणि दुकान परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी जप्त केले आहेत.

Advertisement

न्यायालयात करणार हजर

नागपूर रेल्वे स्थानकावर आणल्यानंतर पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आरोपीचा ट्रान्झिट रिमांड घेतला आहे. नागपूर एटीएसचे पथक आरोपी शिवाजी राठोडला घेऊन पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहे. या आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाणार असून, त्याने हा बॉम्ब रुग्णालयात का ठेवला आणि यामागे त्याचा काय हेतू होता, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
 

Topics mentioned in this article