परतीची तारीख उलटून गेल्यानंतरही पावसाने महाराष्ट्राच्या अनेक भागात धूमाकूळ घातला होता. यंदा कडाक्याची थंडी पडेल असा अंदाज वर्तवला जात होता मात्र पावसाचा मुक्काम वाढल्याने वातावरणात बराच बदल झाला होता. पावसाने पूर्णपणे माघार घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये पारा वाढला होता. नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून किमान तापमानात घट व्हायला सुरूवात झाली होती. सोमवारी म्हणजेच 17 नोव्हेंबर रोजी राज्याच्या अनेक भागांमध्ये बोचरी थंडी जाणवायला सुरूवात झाली होती. पुण्यात ती थोडी जास्तच जाणवत होती. सोमवारी पुण्यातील काही भागातील किमान तापमान हे 9 डिग्री सेल्सियसच्या आसपास नोंदवण्यात आले होते. सोमवारी पुण्यातील काही भागांचे किमान तापमान शिमल्यापेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे.
नक्की वाचा: कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे जास्त थंडी लागते? जाणून घ्या
पुण्यातील पाषाणमध्ये सगळ्यात कमी तापमानाची नोंद
सोमवारी शिमला एअरपोर्ट परिसरात 9.4 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली होती. दिल्लीतील सफदरजंग भागात 9.6 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली होती. मुंबईतील सांताक्रूझमध्ये सोमवारी किमान तापमान 17.4 डिग्री सेल्सियस नोंदवण्यात आले होते. तर पुण्यातील पाषाण भागामध्ये सोमवारी किमान 9 डिग्री सेल्सियस इतके नोंदवण्यात आले.
हवेली आणि बारामतीने पाषाणलाही मागे टाकले
हवामान शास्त्रज्ञ बागाती सुदर्शन पात्रो यांनी X वर पुणे आणि आसपासच्या परिसरातील किमान तापमानाचा तपशील प्रसिद्ध केला आहे. यानुसार कोणत्या भागात सर्वात कमी तापमान होते त्यावर एक नजर टाकूयात.
- गिरीवन-16.5
- वडगाव शेरी-15.8
- चिंचवड-14.5
- लवळे-14.2
- शिरूर-14.0
- भोर-12.1
- कुरवंडे- 11.9
- आंबेगाव-10.7
- दौंड- 9.9
- तळेगाव- 9.9
- शिवाजीनगर-9.4
- माळीण-9.2
- पाषाण9.0
- बारामती-8.9
- हवेली-6.9
नाशिक, जळगावमध्ये कडाक्याची थंडी पडणार
हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार 19 नोव्हेंबर म्हणजेच बुधवारी नाशिक आणि जळगावच्या काही भागात शीत लहरीसारखी स्थिती असेल असा अंदाज वर्तवला आहे.