पूजा खेडकरांवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी फौजदारी गुन्हा दाखल करावा, माजी IAS अरुण भाटिया स्पष्टच बोलले

Pooja Khedkar News : नरेंद्र मोदी यांना आवाहन आहे की त्यांनी वेगवेगळ्या संस्थात्मक बाबी बळकट कराव्यात, त्याशिवाय हे थांबणार नाही, असं देखील अरुण भाटिया यांनी म्हटलं. 

Advertisement
Read Time: 2 mins

राहुल कुलकर्णी, पुणे

ट्रेनी IAS पूजा खेडकर प्रकरणात अनेक गोष्टी एकामागून एक समोर येत आहेत. पूजा खेडकर यांच्यावर आता काय कारवाई होईल, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र सध्या चौकशीचं केवळ नाटक सुरु आहे. पूजा खेडकर यांच्यावर आधी पुणे जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेऊन फौजदारी गुन्हा दाखल करायला हवा, असं माजी सनदी अधिकारी अरुण भाटिया यांनी म्हटलं आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सध्या सगळी शासकीय यंत्रणा भ्रष्ट झालेली आहे. सेवेतील सनदी अधिकारी भ्रष्ट आहेत. ते राजकारण्यांच्या पदराखाली दडलेले आहेत. पूजा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, तात्काळ कारवाई होत नाही यामागे राजकीय शक्ती आहे, असा थेट आरोप अरुण भाटिया यांनी केला आहे. 

(नक्की वाचा - IAS पूजा खेडकर प्रकरणाचा पहिला अहवाल सादर; नवी मुंबई पोलिसांचा धक्कादायक खुलासा)

पूजा खेडकरचे प्रकरण बाहेर आलं याचा आनंद आहे. जनतेला सनदी सेवा किती भ्रष्ट आहे कळालं. 20 टक्के सनदी अधिकारीच प्रामाणिक आहेत. सनदी सेवेमध्ये मुलं केवळ परीक्षा पास होऊन येतात. त्यांची नैतिक गुणवत्ता तपासली जात नाही. त्यासाठी यूपीएससीच्या परीक्षा पद्धतीमध्ये बदल करावा, असं मत देखील अरुण भाटिया यांनी व्यक्त केलं. 

खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या चांगल्या तरुण मुलांना हेरून त्यांना सनदी सेवेत आणलं पाहिजे. नरेंद्र मोदी यांना आवाहन आहे की त्यांनी वेगवेगळ्या संस्थात्मक बाबी बळकट कराव्यात, त्याशिवाय हे थांबणार नाही, असं देखील अरुण भाटिया यांनी म्हटलं. 

Advertisement

(नक्की वाचा- IAS पूजा खेडकर यांचा 'कार'नामा; ओव्हर स्पीड, सिग्नल मोडल्याप्रकरणी ऑडी कारचे 21 चलान प्रलंबित)

काय आहे प्रकरण?

ट्रेन IAS पूजा खेडकर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात असताना खासगी केबिन, शिपाई अशा अनेक अवास्तव मागण्या आणि बेशिस्त वागणुकीमुळे चर्चेत आल्या होत्या. पुणे जिल्हाधिकारी यांच्या तक्रारीनंतर या प्रकरणात चौकशीसाठी केंद्र सरकारने एका समितीची स्थापना केली आहे. दरम्यान पूजा खेडकर यांची वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.

Topics mentioned in this article