- पुण्यातील कोंढवा परिसरात जावयाने आपल्या सासू-सासऱ्यांवर काळी जादू करून संपत्ती हडपण्याचा प्रयत्न केला
- परवेज अब्दुल अजीज मेमन यांने मध्यरात्री कौसरबाग येथील कबरस्तानात अघोरी पूजा करताना स्थानिकांनी पकडले
- आरोपीकडे काळ्या जादूचे साहित्य सापडले असून त्याने पत्नी परत यावी आणि प्रॉपर्टी मिळावी म्हणून ही कृती केली
अजिंक्य धायगुडे पाटील
संपत्तीसाठी जावयाने आपल्याच सासू- सासऱ्यांवर काळी जादू केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पुण्यातील कोंढवा भागात हा थरारक प्रकार उघडकीस आला आहे. सासरची कोट्यवधी रुपयांची संपत्ती हडपण्यासाठी आणि पत्नी परत यावी यासाठी जावयाने थेट कबरस्तानात जाऊन मध्यरात्री अघोरी पूजा केली. स्मशानात काही तरी सुरू आहे हे तिथल्या काही लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या जावयाला पकडले. त्यावेळी त्याच्याकडे काळ्या जादूचे साहित्य सापडले. त्याला चोप दिल्यानंतर त्याने सर्व प्रकार सांगितला. हे पाहून तिथल्या लोकांनाही धक्का बसला.
19 मे रोजी रात्री 12:20 च्या सुमारास कौसरबाग येथील कबरस्तानात हा प्रकार घडला. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात परवेज अब्दुल अजीज मेमन याच्याविरोधात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हसनेन रफिक जाफरानी (वय ४०) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. आरोपी परवेज याचे त्याच्या पत्नीसोबत वाद सुरू होते. ती सध्या त्याच्यासोबत राहत नाही. ती परत यावी शिवाय सासू सासऱ्याची संपत्ती आपल्याला मिळाली असं त्याला वाटत होते. त्यासाठी त्याने काळ्या जादूचा आधार घेतला.
तो मध्य रात्री कौसरबाग कबरस्तानात गेला. त्याच वेळी स्थानिक रहिवाशांना कबरस्तानात काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. त्यांनी आत जाऊन पाहिले तर परवेज हा मेव्हणा, सासू, सासरे आणि मेव्हण्याच्या पत्नीच्या फोटोंवर सुया टोचून काळी जादू करत होता. संतापलेल्या नागरिकांनी त्याला जागीच पकडून बेदम चोप दिला. शिवाय तू हे का करत आहेस याची त्याला विचारणा करण्यात आली. सुरूवातीला त्याने टाळाटाळ केली. तो काही सांगत नव्हता. पण त्याच्या हातातले फोटो सर्व काही सांगत होते.
नक्की वाचा - Gold rates: सोने-चांदी झाली स्वस्त! ग्राहकांना मोठा दिलासा, पाहा आजचे ताजे भाव
प्राथमिक माहितीनुसार, सासरची प्रॉपर्टी आपल्या नावावर व्हावी आणि पत्नीने घरात परत यावे यासाठी त्याने हा अघोरी मार्ग निवडला होता. मेव्हण्याने दिलेल्या तक्रारीनंतर कोंढवा पोलिसांनी जादुटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेच्या दोन दिवसानंतर पोलीसात तक्रार देण्यात आली होती. राज्यात अंधश्रद्धा निर्मुलन कायदा आहे. तरी ही अनेक जण काळी जादू आणि अघोरी पुजेवर विश्वास ठेवतात. शिवाय ही घटना पुण्यात घडल्याने तर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.