सूरज कसबे
पुण्यात गुन्हेरीच्या घटनांना आळा बसताना दिसत नाही. एकीकडे गँगवॉर सुरू आहे. तर दुसरीकडे लैंगिक अत्याचार, खून, कोयता गँग, हाणामारी या सारख्या घटना वाढतच आहे. पुणे आणी परिसराला जणू गुन्हेगारांनी विळखा घातलाय की काय अशीच काही स्थिती निर्माण झाली आहे. आधी आंदेकर कोमकर टोळी युद्धामुळे पुणे हादरून गेलं होतं. त्या घटना ताज्या असतानाच माया गँगने बाजीराव रोडवर अल्पवयीन मुलाची हत्या केली. त्यात आता आणखी एक भर पडली आहे. पुन्हा एकाद पुण्यात गोळीबार झाला आहे. ही घटना आळंदीत घडली आहे.
आळंदी-दिघी रोड परिसरात एका धक्कादायक घटना घडली आहे. त्यात 37 वर्षीय नितीन गिलबिले यांची त्यांच्याच मित्रांनी डोक्यात गोळी झाडून हत्या केली आहे. या हल्ल्यात गिलबिले यांचा जागीच मृत्यू झाला आहे. दिघी पोलीस सध्या घटनेची नोंद घेऊन फरार असलेले संशयित आरोपी मित्र अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर यांचा कसून शोध घेत आहेत. अद्याप हत्येमागचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी दिघी पोलीस अधिक तपास करत आहेत. या हत्येनंतर परिसरात भीती वातावरण आहे. डोक्यात गोळी मारल्याने तिथे असलेल्या लोकांची एकच धावपळ झाली.
अशा घटनांना आळा कसा घालायचा असा प्रश्न आता पुणे पोलीसांसमोर आहे. पुणे पिपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारीच्या घटना या वाढत चालल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना त्याचा नाहक त्रास ही सहन करावा लागत आहे. त्यात पुण्याची ओळख गुन्हेगारांचे शहर असं होते की काय अशी भिती ही व्यक्त केली जात आहे. विद्येचे माहेर घर म्हणून पुण्याची ओळख आहे. ती ओळख अशा वाढणाऱ्या घटनांमुळे पुसते की काय असे जुने पुणेकर म्हणत आहे. पुण्यात एका मागून एक अशा घटना होत आहे. त्यामुळे पोलीसांचा धाक पुण्यातील गुंडांना आहे की नाही याची चर्चा सुरू झाली आहे.