देवा राखुंडे, इंदापूर
पुण्याच्या इंदापुरातून पोलीस हवालदार विष्णू केमदारणे हे मंगळवारी 10 जून रोजी पहाटेपासून बेपत्ता झाले आहेत.केमदारणे यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली असून या चिठ्ठीमधून इंदापूरचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी केमदारणे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
केमदारणे यांच्या पत्नी प्रियंका केमदारणे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात विष्णू केमदारणे बेपत्ता झाल्याची तक्रार देखील दाखल केली आहे. प्राप्त तक्रारीवरून विष्णू केमदारणे यांच्या शोधकामी पोलीस पथक तयार करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी दिली आहे. यासोबतच पोलीस कर्मचारी केमदारणे यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमधून जे आरोप केलेत त्याची वरिष्ठ स्तरावरून चौकशी केली जाईल आणि त्याप्रमाणे वरिष्ठ कार्यालयाला अहवाल पाठवला जाईल, असेही राठोड यांनी सांगितलं आहे.
(नक्की वाचा- Sangli News: झोपेतच नवऱ्याला क्रूरपणे संपवलं, वटपौर्णिमेच्या दिवशीच नवविवाहितेचं कृत्य)
यानंतर पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून कोकणे एका पोलीस कर्मचाऱ्याला बोलतानाच हे संभाषण आहे. यात ते केमदारणे याला समजावून सांग त्याला गाडून टाकीन असं कोकणे म्हणत आहेत. केमदारणे यांनी लिहिलेली एक चिठ्ठीसमोर आली असून या चिठ्ठीतून त्यांनी इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यासह अन्य दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
(नक्की वाचा- Pune News: कात्रज कोंढवा रस्त्याचे 7 वर्ष रखडलेले काम मार्गी लागणार, दोषींवरही कारवाई होणार)
काय लिहिलं आहे चिठ्ठीत?
मागील दोन महिन्यांपासून पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी पोलीस हवालदार रासकर आणि पोलीस कॉन्स्टेबल सूर्यवंशी यांच्या सांगण्यावरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तुझी नोकरी व यापुढील आयुष्य हे उद्ध्वस्त करून टाकेल, अशी भाषा वापरून मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे, असं या चिठ्ठीत लिहिले आहे. माझ्या या अवस्थेला होणाऱ्या परिणामांना पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे हेच जबाबदार आहेत, असंही या चिठ्ठीमध्ये लिहिण्यात आलं आहे.