रेवती हिंगवे
सराफानेच आपल्या दुकानावर दरोडा टाकल्याची घटना पुण्यातील धायरी परिसरात घडली. श्री ज्वेलर्स मध्ये 15 एप्रिल 2025 ला दरोडा पडल्याची घटना घडली होती. यात जवळपास 22 ते 25 तोळे सोनं चोरण्यात आलं होतं. या सगळ्या प्रकाराबाबत पुणे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. त्या तपासात धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली. श्री ज्वेलर्स या दुकानाचा मालक विष्णू दहिवाळ यानेच या दरोड्याचा बनाव केला होता. कर्जबाजारी झाला असल्या कारणाने त्याने ही शक्कल लढवली होती. पण त्यामुळे त्याच्या दुकानात गुंतवणूक करणाऱ्या सर्व सामान्यांना नाहक झटका बसला आहे. व्याज सोडा मुद्दलही आता मिळणार नाही यामुळे हातावर पोट असणारी ही मंडळी हवालदिल झाली आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पोलिसांनी नंतर दुकानाचा मालक विष्णू दहिवाळ अटक केली. त्याने त्यावेळी आश्वासन दिले की सगळ्यांचे पैसे परत फेडण्यात येतील. पण अगदीच तीन ते चार दिवसात तो फरार झाला. आज जवळपास दोन महिने झाले तो अजूनही बेपत्ता आहे. या सगळ्यामध्ये ज्यांनी श्री ज्वेलर्स मध्ये गुंतवणूक केली होती, त्यांना मात्र नाहत त्रास सहन करावा लागत होता. गुंतवणूक करणारे कुणी मोठे नव्हते. सर्व जण हातावर पोट असणारे होते. त्या लोकांनी पै-पै जमा करत भिशी लावली होती. तर काहींनी सोने तारण ठेवले होते. त्यात कुणी सफाई कर्मचारी,तर कुणी धुणीभांडी करणारे होते. जवळपास दोन कोटींचं घबाड घेवून तो दुकानदार रफ्फूचक्कर झाला आहे.
या सगळ्या गुंतवणुकदारांशी NDTV मराठीने संवाद साधला. त्यामुळे त्यांनी आपल्यावर आभाळ कोसळलं आहे असं सांगितलं. एक सफाई कर्मचारी आहे. त्यांनी त्यांच्या 24 वर्षांची कमाई म्हणजे एकूण 22 लाख रुपये या ज्वेलर्सकडे गुंतवले होते. आरोपी श्री ज्वेलर्सचा मालक म्हणजेच विष्णू दहिवाळ याने आमिष दाखवलं होतं. 18 टक्के व्याज देण्याच. शिवाय घर घेऊन देण्यासाठी तो मदत ही करणार होता. पण शेवटी काय झालं? ना व्याज मिळालं, ना मुद्दल मिळाली. हातावर पोट असलेल्या माणसाची आयुष्यभराची कमाई एका भामट्यामुळे पणाला लागली.
तर दुसरीकडे, राजेश्री स्वामी नावाच्या महिला ज्या एका हॉटेल मध्ये कामाला जातात. त्यांचा अपघात झाला होता. त्यामुळे त्या अपंग झाल्या. तेव्हा त्यांनी अर्धा तोळं सोनं तारण ठेवलं होतं. काही गुंतवणूक पण केली होती. त्यांनी हॉटेलमध्ये काम करून त्यांच्या नवऱ्याने रिक्षा चालवून पैसे जोडले होते. तेच पैसे त्यांनी श्री ज्वेलर्समध्ये गुंतवले होते. जेव्हा खोटा दरोडा पडला होता तेव्हा विष्णु दहिवाळ याने त्यांना आश्वासन दिलं होतं, की तुमचे दागिने आणि पैसे परत देतो. पण आज तो फरार आहे. बाहेरून कर्ज घेतलेलं अजून फेडता आलं नाही. आज खूप अवघड परिस्थिती त्यांच्यावर आली आहे. एकीकडे पोलीस त्यांची तक्रार नीट घेत नाही असा आरोप ही या महिलांनी केला आहे.