राज्यातील अनेक भागात शुक्रवारी (25 जुलै) दमदार पाऊस झाला. पुणे जिल्ह्यातल्या पवना तसंच भाटघर धरणातील पाणी पातळीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या वाढीमुळे त्या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पवना धरण सद्यस्थितीमध्ये 84.87% भरलेले आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस चालू असून धरणामध्ये मोठा येवा प्राप्त होत आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित करणेकरिता सद्यस्थितीत नदीपात्रामध्ये सांडव्यावरून 1500 क्युसेक्स, तर जलविद्युत केंद्रातून 1000 क्युसेक्स असा एकूण 2500 क्युसेक्स विसर्ग चालू आहे.तरी, रात्री 20:00 वाजता सांडव्यावरील विसर्ग वाढवून 3000 क्युसेक्स तर जलविद्युत केंद्रामधील विसर्ग वाढवून 1400 क्युसेक्स करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पवना नदीपात्रामध्ये एकूण विसर्ग 4400 क्युसेक्स इतका राहणार आहे, असा इशारा खडकवासला पाटबंधारे विभागानं दिला आहे.
पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त केला जाऊ शकतो. त्यामुळे पवना नदीकाठच्या नागरिकांनी नदीपात्रात उतरु नये. दीमधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे तसंच अन्य साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावीत, अशी सुचना पाटबंधारे विभागानं दिलीय.
( नक्की वाचा : Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा,6 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट )
भाटघर धरणाच्या पाणी पातळीत वाढ
भाटघर धरणाच्या पाणी पातळीमध्येही शुक्रवारी (25 जुलै) झपाट्यानं वाढ झाली आहे. रात्री ०९:३० वा. धरण ९२.४३ % भरले आहे. त्यामुळे धरणामध्ये सुरू असणाऱ्या येव्याचे प्रमाण लक्षात घेता उद्या दि. २६/०७/२०२५ रोजी ठीक सकाळी ८:०० वाजता भाटघर धरणाच्या विद्युत निर्मिती केंद्र द्वारे नदीपात्रामध्ये १७५० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात येत आहे.
त्यामुळे नागरिकांनी कृपया नदीपात्रात उतरू नये नदीच्या पात्रात कुठल्या विभागाचे काम सुरू असेल तर त्या विभागाने बांधकाम साहित्य व कामगार यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे, असं आवाहन पुण्यातील पाटबंधारे विभागाने केली आहे.