
राज्यात पुढील 24 तासांसाठी रायगड, रत्नागिरी, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय, पुणे घाट आणि सातारा घाट परिसरातही रेड अलर्ट (Maharashtra Rain Red Alert) देण्यात आला असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने दिली आहे.
( नक्की वाचा: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवेला नदीचं रुप )
6 जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा
भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी 25 जुलै 2025 रोजी सायंकाळी 5.39 वाजल्यापासून ते 27 जुलै 2025 रोजी रात्री 8.30 वाजेपर्यंत 4.1 ते 4.8 मीटर उंचीच्या लाटांचा इशारा दिला आहे. या कालावधीत लहान बोटींना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समुद्राची धूप आणि उंच लाटांचे तडाखे किनारपट्टीवर येण्याची शक्यता असल्याने, जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जगबुडीने इशारा पातळी ओलांडली
रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पवना धरण 82.21% भरले असून, पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे. पवना धरणातून 1600 क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडले जाऊ शकते, त्यामुळे नागरिकांना त्याअनुषंगाने सूचित करण्यात आले आहे.
( नक्की वाचा: मराठी तरुणीला मारहाण करणाऱ्या आरोपीचा माज कायम )
मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या मोडक सागर, मध्य वैतरणा, आणि तानसा या धरणांमधून अनुक्रमे 4488.25 क्युसेक्स, 2012.67 क्युसेक्स आणि 3315.25 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे.
आपत्तीच्या अनुषंगाने प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांना संभाव्य आपत्कालीन परिस्थितीत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.