Pune 2 New Trains: पुणे आणि आसपासच्या परिसरातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव बुधवारी (17 जून) दोन नवीन रेल्वे गाड्यांचे लोकार्पण करणार आहेत. यामध्ये पुणे ते बिहारमधील दानापूर दरम्यान धावणाऱ्या 'अमृत भारत एक्सप्रेस' आणि पुणे ते साईनगर शिर्डी यादरम्यान धावणाऱ्या ट्रेनचा समावेश आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. या दोन्ही गाड्यांमुळे बिहार आणि शिर्डीला जाणाऱ्या हजारो प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि सोयीचा होणार आहे.
हडपसर स्थानकावरून सुटणार अमृत भारत एक्सप्रेस
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-दानापूर अमृत भारत एक्सप्रेस ही मुख्य पुणे स्टेशनऐवजी हडपसर रेल्वे स्थानकावरून सुटणार आहे. या ट्रेनचे अंतिम वेळापत्रक रेल्वे प्रशासनाकडून लवकरच जाहीर केले जाईल. या ऐतिहासिक उद्घाटनाचा मुख्य कार्यक्रम पुणे आणि हडपसर या दोन्ही रेल्वे स्थानकांवर एकाच वेळी आयोजित केला जाणार आहे. विशेष म्हणजे या सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहणार आहेत.
(नक्की वाचा : Pune-Shirdi Railway: साईभक्तांसाठी खुशखबर! पुणे-शिर्डी पहिली थेट रेल्वे सेवा 17 जूनपासून सुरू)
नॉन-एसी प्रवाशांना मिळणार 'वंदे भारत'सारख्या आधुनिक सुविधा
सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास अधिक सुसह्य करण्यासाठी रेल्वेने 'अमृत भारत एक्सप्रेस' ही नवी संकल्पना आणली आहे. या ट्रेनचे वैशिष्ट्य म्हणजे, यामध्ये प्रवाशांना अगदी वंदे भारत एक्सप्रेससारख्याच अत्याधुनिक सुविधा मिळतील. पण वंदे भारत ट्रेन पूर्णपणे वातानुकूलित (AC) असते, याच्या उलट अमृत भारत एक्सप्रेस ही पूर्णपणे नॉन-एसी (विना-वातानुकूलित) सेवा असणार आहे. या ट्रेनमध्ये सामान्य (General) आणि स्लीपर क्लासचे (Sleeper Class) डबे असतील, जेणेकरून सर्वसामान्य प्रवाशांना कमी खर्चात आधुनिक आणि आरामदायी प्रवासाचा आनंद घेता येईल.
शिर्डीसाठी आता रोज ट्रेन; साईभक्तांसाठी खूशखबरपुण्यातून शिर्डीला जाणाऱ्या भाविकांची संख्या खूप मोठी आहे. हीच गरज ओळखून रेल्वे प्रशासनाने पुणे आणि साईनगर शिर्डीला जोडणारी नवीन ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष बाब म्हणजे ही ट्रेन आठवड्यातून काही दिवस न धावता या मार्गावर रोज धावणार आहे. यामुळे साईभक्तांना आता कोणत्याही दिवशी शिर्डीला जाणे अत्यंत सोपे होणार आहे.