Pune News : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. रात्री उशीरा किंवा अवेळी घराबाहेर पडणं धोक्याचं ठरत आहे. पुणे जिल्ह्यातील नागरिकांमध्येही सध्या घबराट पसरली आहे.
पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील कौलीमळा परिसरात एकाच वेळी तीन बिबटे आढळल्याने नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रवींद्र वाळके यांच्या घरासमोर पहाटे ३ वाजता हे बिबटे दिसले. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये बिबटे घराभोवती घिरटे घालताना दिसत आहे. (Leopard terror in Pune district)
नक्की वाचा - Pune News: पुण्यात उघड्यावर शेकोट्या करताय? त्या आधी ही बातमी नक्की वाचा, महापालिकेचा इशारा काय?
पुण्यातील ३ वाजताचा धक्कादायक व्हिडिओ
दुसरीकडे पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातल्या सणसवाडी–नरेश्वर मंदिर परिसरात बिबट्यांची दहशत पुन्हा डोकं वर काढतेय. आज रात्री एका प्रवाशाने रस्त्यावरच काढलेल्या व्हिडिओमध्ये तब्बल तीन–चार बिबटे निर्धास्तपणे फिरताना दिसले. हा प्रकार पाहून स्थानिकांच्या अंगावर अक्षरशः काटा आला.
या भागात आधीच बिबट्यांचा वावर वाढलाय. संध्याकाळ झाली की लोक बाहेर पडायलाच घाबरतात. दुचाकीवरून ये-जा करणाऱ्यांना तर फारच भीती वाटते. कारण बिबटे चालत्या गाड्यांवरही हल्ला करतात, असा अनुभव इथल्या लोकांना आलाय. अंधार पडल्यानंतर अनेक कुटुंबं स्वतःला घरातच कोंडून घेतात. नागरिकांचं म्हणणं आहे की, आता ही परिस्थिती हाताबाहेर जात चाललीये. बिबटे इतक्या मुक्तपणे फिरत असताना कोणत्याही क्षणी अनर्थ होऊ शकतो. त्यामुळे वनविभागाने तातडीने गस्त वाढवावी, कॅमेरे लावावे आणि या भागात काय परिस्थिती आहे ते नीट पाहून ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.