रेवती हिंगवे, प्रतिनिधी
पुणे आणि परिसरात सुरु असलेल्या पावसानं पुणेकरांची चिंता वाढली आहे. खडकवासला धरण साखळी क्षेत्रातील चारही धरणांमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांमध्ये सुमारे 93 टक्के पाणीसाठा आहे. खडकवासला धरणातून शनिवारपासून 27016 क्युसिक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. या पावसामुळे पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलाय. तसंच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
येरवड्यातील नागरिकांचं स्थालंतर
पुण्यातील येरवडा परिसरातील शांतीनगरमधल्या झोपडपट्टीत पाणी शिरण्यास सुरुवात झाली. त्यामुळे या परिसरातील 500 नागरिकांना स्थलांतरित करण्याचे कार्य PMRDA आणि अग्निशमन दलानं शनिवारी रात्री उशीरा हाती घेतलं होतं. त्यांना जवळच्या पेरुळकर शाळेत स्थालंतरित करण्यात आलं आहे. मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण 90 टक्के भरले आणि त्यामुळे पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.
( नक्की वाचा : खडकवासला धरण क्षेत्रातील पावसाने पुणेकरांची चिंता वाढली; नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे अजित पवारांचे आवाहन )
कोणत्या भागाला धोका ?
पुण्यात सुरु असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी पुणेकरांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. विशेषत: सिंहगड रोड, संगमवाडी, दांडेकर पूल, विश्रांतवाडी, बालेवाडी, बाणेर या ठिकाणी पाणी शिरण्याची शक्यता आहे. या विसर्गाची नोटीस सर्व नागरिकांनी गांभीर्यानं घ्यावी. जेणेकरुन कोणतीही जीवतहानी तसंच वित्तहानी होणार नाही, असं आवाहन भोसले यांनी केलं. पुणेकरांनी महापालिकेच्या (020) 25501269, (020) 25506800 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन भोसले यांनी केलं.