Pune FDA Raids: पुण्यातील पेठांमध्ये FDA ची धडक कारवाई! अनेक मिठाई दुकानांवर छापे; 5 हॉटेल्सचे परवाने निलंबित

पुण्यातील प्रसिद्ध पेठांमधील मिठाई दुकाने आणि हॉटेल्स आता FDA च्या रडारावर आली आहेत. एफडीएने 24 ते 27 जुलै दरम्यान पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून 45 लाख 70 हजार रुपयांचा संशयित आणि भेसळयुक्त अन्नसाठा जप्त केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अजिंक्य धायगुडे, पुणे

नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पुणे विभागात मोठी धडक कारवाई सुरू केली आहे. पुण्यातील मध्यवर्ती गणेश पेठ आणि नाना पेठ परिसरातील घाऊक व्यापाऱ्यांवर विशेष लक्ष केंद्रित करत एफडीएने छापे टाकले आहेत. या कारवाईमुळे पुणे, सातारा आणि सांगलीतील खाद्यपदार्थ व्यापाऱ्यांचे धाबे दाणले आहेत.

4 दिवसांत 45.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

अन्नातील भेसळ, निकृष्ट दर्जा आणि अन्न सुरक्षा नियमांच्या उल्लंघनाविरोधात एफडीएने 24 ते 27 जुलैदरम्यान विशेष तपासणी मोहीम राबवली. चार दिवसांच्या या धडक मोहिमेत तब्बल 45 लाख 70 हजार 167 रुपयांचा संशयित, निकृष्ट, असुरक्षित आणि चुकीचे लेबलिंग असलेला अन्नसाठा जप्त करण्यात आला.

Advertisement

(नक्की वाचा-  IAS Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईला न्यायालयाचा झटका! 8 दूध डेअरींना दिलासा)

यामध्ये मिठाई, कँडी, चॉकलेट्स, सुका मेवा, मसाले आणि फरसाण आदी खाद्यपदार्थांचा समावेश आहे. जप्त केलेल्या सर्व अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

5 हॉटेल्स निलंबित, जुन्नरमधील कुल्फी सेंटरचा परवाना रद्द

केवळ पुणे शहरातील पेठांमधील दुकानेच नव्हे, तर जिल्ह्यातील आणि विभागातील इतर अन्न व्यवसायिकांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुणे शहरातील 5 प्रसिद्ध हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

(नक्की वाचा-  लोक हसले, पण गडी खचला नाही; 4 आंबे साडेतीन लाखांना विकून दाखवले, उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्याची देशभर चर्चा)

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एका कुल्फी उत्पादन केंद्राचा परवाना थेट रद्द करण्यात आला आहे. सातारा आणि सांगलीतही रेड: पुण्यासोबतच सातारा आणि सांगली जिल्ह्यातही एफडीएच्या पथकांनी छापे टाकून अन्नसाठा जप्त केला आहे.

नागरिकांनी उघड्यावरील किंवा संशयित ठिकाणचे खाद्यपदार्थ खरेदी करू नयेत आणि अन्नामध्ये भेसळ आढळल्यास एफडीएकडे तक्रार करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
 

Advertisement

Topics mentioned in this article