रेवती हिंगवे, प्रतिनिधी
Pune Flood : प्रत्येक पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूरस्थितीची पुनरावृत्ती यंदाही झाली असून, खडकवासला धरणातून सुरू असलेल्या पाण्याचा विसर्ग पुणेकरांसाठी डोकेदुखी ठरला आहे. यंदाही सिंहगड रस्त्यावरील एकता नगरीमध्ये पाणी शिरले, ज्यामुळे नागरिकांना पुन्हा एकदा सुरक्षित स्थळी हलवावे लागले. ही परिस्थिती केवळ निसर्गाचा कोप नसून, शहरी नियोजनातील अक्षम्य दुर्लक्ष आणि राजकीय आश्वासनांच्या पोकळपणाचा गंभीर परिणाम असल्याचे स्पष्ट होत आहे.
मागील वर्षीच्या कटू अनुभवानंतरही प्रशासनाने ठोस उपाययोजना केल्या नाहीत, हेच या घटनेतून पुन्हा सिद्ध झाले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्यासह अनेक नेत्यांनी पाहणी दौरे केले, आश्वासने दिली, मात्र प्रत्यक्ष कृती झाली नाही. NDTV मराठी शी बोलताना एका रहिवाशानं सांगितलं की “भिंत बांधून देणार होते, पण ती अजूनही कुठेच दिसत नाही,” ही रहिवाशांची प्रतिक्रिया प्रशासनाच्या निष्क्रियतेवर गंभीर भाष्य करणारी आहे.
या समस्येचे मूळ हे ब्लू लाइन (नदीपात्राची मर्यादा) मध्ये झालेले अनधिकृत बांधकाम आहे. नदीच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा निर्माण करणाऱ्या या बांधकामांना जेव्हा परवानगी देण्यात आली, तेव्हा दूरदृष्टीचा अभाव दिसून आला.
( नक्की वाचा : Sangli News : लग्नानंतर तब्बल 21 वर्षांनी झाला मुलगा, कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यात सोडला... कारण काय? )
पुणेकरांना विकासाच्या नावाखाली अशा धोक्याच्या ठिकाणी घरबांधणी करण्यास प्रोत्साहन देणे, हे कोणाच्या फायद्याचे आहे, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. महापालिका आयुक्तांनी २०२६ पर्यंत ही समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले असले, तरी यापूर्वीची आश्वासने फोल ठरल्याने नागरिकांचा विश्वास डळमळीत झाला आहे. भविष्यातील संकटे टाळण्यासाठी केवळ घोषणा नव्हे, तर कठोर धोरणे आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे..