Pune News: 10 वाजले की खेळ खल्लास! पुण्यातील प्रसिद्ध खाऊगल्ल्या आता बंद होणार? वाचा महत्त्वाचे अपडेट

Pune News: या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे आणि रात्री उशिरा कामावरून घरी परतणाऱ्यांचे मात्र मोठे हाल होत आहेत. 

जाहिरात
Read Time: 2 mins
Pune News :पुणे पोलीस आयुक्तांनी सलग 2 दिवस शहराचा आढावा घेतल्यानंतर हा कठोर निर्णय घेतला आहे.
पुणे:

अजिंक्य धायगुडे-पाटील, तन्मय टिल्लू, प्रतिनिधी 

Pune News: पुण्यातील प्रसिद्ध खाऊगल्ल्यांवर आता रात्री 10 च्या ठोक्याला पोलिसांचा 'वॉच' असणार आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील सर्व खाऊगल्ल्या आणि पथारी व्यावसायिकांना रात्री 10 वाजेपर्यंतच व्यवसाय करण्याची परवानगी दिली आहे. पोलिसांच्या या निर्णयामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न असला तरी, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे आणि रात्री उशिरा कामावरून घरी परतणाऱ्यांचे मात्र मोठे हाल होत आहेत. 

काय आहे निर्णय?

पुणे पोलीस आयुक्तांनी सलग 2 दिवस शहराचा आढावा घेतल्यानंतर हा कठोर निर्णय घेतला आहे. अनेक खाऊगल्ल्या मध्यरात्रीपर्यंत सुरू राहत असल्याने तिथे मोठी गर्दी जमते, ज्याचा परिणाम सार्वजनिक शांतता आणि वाहतुकीवर होतो, असे पोलिसांचे मत आहे. त्यामुळे आता रात्री 10 वाजता पोलिसांची व्हॅन फिरून सर्व स्टॉल्स बंद करण्याच्या सूचना देण्यात देत आहे. या आदेशानुसार रस्त्यावरील फूड स्टॉल्स, हॉकर्स, पान शॉप्स आणि अगदी फुटपाथवरील आउटडोअर डायनिंगही 10 नंतर पूर्णपणे बंद राहणार आहे.

Advertisement

( नक्की वाचा : NEET Paper Leak : नीटचा पेपर आता सैन्याच्या पहाऱ्यात? पेपर लीक रोखण्यासाठी मोदी सरकारचा 'सर्जिकल स्ट्राईक' )

विद्यार्थ्यांच्या पोटाचा प्रश्न ऐरणीवर

पुणे हे शिक्षणाचे माहेरघर असून इथे लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी येतात. अभ्यासाच्या गडबडीत अनेक विद्यार्थी रात्री उशिरा जेवण्यासाठी खाऊगल्ल्यांचा आधार घेतात. खाऊगल्ल्यांमधील जेवण स्वस्त आणि परवडणारे असल्याने विद्यार्थ्यांची तिथे मोठी गर्दी असते. 

मात्र, आता 10 वाजता सर्व बंद होत असल्याने या विद्यार्थ्यांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. हॉटेल्सचे दर परवडणारे नसल्याने या विद्यार्थ्यांनी आता जेवायचे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

( नक्की वाचा : Pune News: पुण्यात गरवारे पुलावरून कार खाली कोसळली! 19 वर्षांच्या तरुणाचा ड्रिंक अँड ड्राईव्हचा प्रताप )
 

व्यावसायिकांचे कंबरडे मोडले

या निर्णयाचा सर्वाधिक फटका छोट्या हॉटेल व्यावसायिकांना आणि स्टॉल धारकांना बसला आहे. व्यावसायिकांच्या मते, खाऊगल्ल्यांचा खरा व्यवसाय रात्री 10 नंतरच सुरू होतो, जो 12 वाजेपर्यंत चालतो. 

या नवीन आदेशामुळे व्यावसायिकांचे तब्बल 50 ते 70 टक्के ग्राहक कमी झाले आहेत. महागाईच्या काळात आधीच पालेभाज्या, तेल आणि इंधनाचे दर वाढलेले असताना, प्रशासनाच्या या निर्णयामुळे व्यावसायिकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.

Advertisement

बकरी ईद आणि इतर सण, तसेच इंधन दरवाढीमुळे होऊ शकणारी आंदोलने लक्षात घेता शहरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकारचे मोर्चे, सभा किंवा मिरवणुका घेण्यास सध्या मनाई आहे. याच पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी खाऊगल्ल्यांवर ही मर्यादा आणण्यात आली आहे. मात्र, प्रशासनाच्या या निर्णयामुळे एका बाजूला व्यावसायिक संकटात सापडले आहेत, तर दुसऱ्या बाजूला सर्वसामान्यांची गैरसोय होत आहे.
 

Topics mentioned in this article