पुण्यात गणेशोत्सवाचे 10 दिवस ड्राय डे? कायदा-सुव्यवस्थेसाठी मंडळांनी केली मागणी
यंदाच्या गणेशोत्सवात ड्राय डे ठेवावा अशी मागणी करण्यात आली आहे. गणेश उत्सवात दहा दिवस पुणे शहरात दारूबंदी ठेवावी अशी मागणी पुणे पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे. पुण्यातील काही गणेश मंडळांनीच याबाबत आयुक्तांकडे मागणी केली आहे. दहा दिवस ड्रायडे ठेवल्याने कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहील असं मत गणेश मंडळांकडून केलं जात आहे. पोलीस मिरवणुकीत पारंपरिक ढोल आणि डीजे संदर्भात स्वतः निर्णय घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. विसर्जन मिरवणुकीत एका मंडळासमोर किती ढोल पथके असणार याचा निर्णय पुढच्या आठवड्यात घेण्यात येईल अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. गणेशोत्सवादरम्यान महाराष्ट्रभरातील अनेक मिरवणुकीत दारू पिऊन धिंगाणा घातल्याचा प्रकार समोर येत आहे. त्यामुळे गणेशोत्सवाचे दहा दिवस ड्राय डे ठेवावे अशी मागणी केली जात आहे.