पुण्यातील सुप्रसिद्ध आणि जुन्या हॉटेलपैकी एक असलेल्या कॅफे गुडलक (Cafe Goodluck) या हॉटेलला अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) पुन्हा एकदा परवाना बहाल केला आहे. अन्न सुरक्षा विभागाच्या पुन्हा तपासणीत या हॉटेलने स्वच्छता व सॅनिटेशनचे सर्व नियम पाळल्याचे आढळून आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
10 जुलै रोजी सोशल मीडियावर एका ग्राहकाने “बन मस्का”मध्ये काच आढळल्याचा व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओनंतर अन्न व औषध प्रशासनाने तत्काळ कारवाई करत एफसी रोडवरील मुख्य ब्रँचचा परवाना तात्पुरता रद्द केला होता.
FDA कडून अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा या रेस्टॉरंटची तपासणी केली. तपासणीत स्वयंपाकघर, स्वच्छतागृहे, कचरा व्यवस्थापन, कर्मचारी आरोग्य तपासणी, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता आणि भांड्यांची स्वच्छता यांची कसून पाहणी करण्यात आली. या सर्व बाबींमध्ये सुधारणा झाल्याचे लक्षात आल्यानंतर FDAने परवाना पुन्हा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
का झाली होती कारवाई?
डेक्कन परिसरातील गुडलक कॅफेमध्ये आकाश जलगी हे त्यांच्या पत्नीसह कॅफे गुडलकमध्ये गेले होते. त्यांनी चहा बन मस्काची ऑर्डर दिली होती. ऑर्डर आल्यावर ते चहा घेत असताना त्यांच्या लक्षात आलं की बन मस्का ज्या डिशमध्ये दिला, त्यामध्ये काचेचे तुकडे त्यांना दिसले. सुरूवातील बर्फ वाटला होता. पण त्यांनी पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आलं की बर्फाचे तुकडे नसून काचेचेच आहेत. यानंतर त्यांनी व्हिडीओ तयार केला. कर्मचाऱ्यांना जाब विचारला होता, त्यावेळी त्यांच्याकडी काही उत्तर नव्हतं.
त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाकडे (एफडीए) याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. बन मस्क्यात काचेचे तुकडे आढळल्यामुळे 'गुडलक कॅफे'चा परवाना तात्पुरत्या स्वरूपात निलंबित करण्यात आला होता.