Pune News : पुण्यातील तब्बल ३०० किलोमीटर रस्त्याचं बांधकाम अवघ्या ७५ दिवसात पूर्ण करण्यात आलं आहे. रस्त्यांवरील खड्डे हा मुंबई-पुणेकरांसाठी कळीचा प्रश्न असतो. पुण्यात मात्र एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पुण्यातील रस्ते चकाचक करण्यात आले आहेत. रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे काम करण्यात आलं आहे.
कोणती आहे ही स्पर्धा?
पुण्यात लवकरच पुणे ग्रँड टूर या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी पुणे जिल्ह्यातील ३०० किलोमीटर रस्त्याचं बांधकाम पूर्ण करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या नियमानुसार गुणवत्तापूर्ण पद्धतीने हे रस्ते तयार करण्यात आले आहेत. या रस्त्यासाठी सिमेंट बेस ट्रिटमेंट पद्धतीचा वापर करुन पाया मजबूत करण्यात आला आहे. त्यावर डांबरीकरण करण्यात आलं. त्यामुळे पुढील पाच वर्षे हा रस्ता चांगला राहिल असं सांगितलं जात आहे.
पहिल्यांदाच पुणे, पिंपरी-चिंचवड या आंतरराष्ट्रीय या सायकल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून जगभरातील ३५ देशातील नामांकित १३१ सायकल स्पर्धेक यावेळी सहभागी होतील. पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा, मुळशी, पुरंदर, मावळ, हवेली या तालुक्यातील काही भागात सायकल स्पर्धेचा रूट असेल. पीएमआरडीए, जिल्हा नियोजन समिती आणि राज्य सरकारकडून २९४ कोटी उभे करून रस्त्याचं काम करण्यात आलं. यामध्ये १०० किमी रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आलं आहे.