Pune News: पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पावसाळ्यात होणारी भयानक वाहतूक कोंडी आणि जड वाहने बंद पडल्यामुळे निर्माण होणारे ट्रॅफिक जॅम टाळण्यासाठी प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत जड आणि अवजड वाहनांना थेट प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. 9 जुलैपासून पुढील आदेश येईपर्यंत हा नियम लागू राहणार असून, सर्व वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
पावसाळ्यात शहरातील मुख्य रस्त्यांवर जड वाहने बंद पडल्यास संपूर्ण ट्रॅफिक विस्कळीत होते. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी हे आदेश जारी केले आहेत. या निर्णयामुळे शहरातील रस्त्यांवर होणारी वाहनांची गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.
मुंबई आणि सोलापूर मार्गासाठीचे पर्यायी मार्ग
सोलापूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या जड वाहनांनी केडगाव - चौफुला - न्हावरे - तळेगाव ढमढेरे - शिक्रापूर - चाकण या मार्गाने जावे. याशिवाय उरुळी कांचन - कोरेगाव मूळ - अष्टापूर - तळेगाव ढमढेरे - शिक्रापूर - चाकण हा पर्यायही उपलब्ध आहे.
दुसरीकडे, मुंबईहून सोलापूरकडे जाणाऱ्या वाहनांना तळेगाव दाभाडे - चाकण - शिक्रापूर - तळेगाव ढमढेरे - न्हावरे - केडगाव - चौफुला या मार्गाचा वापर करावा लागेल. तसेच कात्रज - मंतरवाडी फाटा - वडकी - दिवेघाट - सासवड - जेजुरी - मोरगाव - सुपे - केडगाव चौफुला या पर्यायी मार्गानेही प्रवास करता येईल.
( नक्की वाचा : DMart News: झेप्टो-ब्लिंकिटमुळे डी मार्टला फटका? दमानींनी शोधला नवा तोडगा, ग्राहकांना मिळणार मोठी लॉटरी )
अहिल्यानगर आणि सासवड मार्गाची नवी नियमावली
मुंबईहून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या वाहनांनी तळेगाव, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटा मार्गाचा वापर करावा. तर अहिल्यानगरकडून मुंबईला जाणाऱ्या वाहनांसाठी शिक्रापूर - चाकण - तळेगाव हा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. यासोबतच सासवडकडून सोलापूरकडे जाणाऱ्या वाहनांनी सासवड - जेजुरी - मोरगाव - सुपे - केडगाव - चौफुला या मार्गाने जाणे बंधनकारक असेल.
शहरात मालवाहतुकीसाठी वेळ काय?
पुणे शहरात अंतर्गत भागात मालाची चढ-उतार करणाऱ्या वाहनांना पूर्णबंदी नसेल, मात्र त्यांच्यासाठी रात्री 11 ते सकाळी 6 ही विशिष्ट वेळ ठरवून देण्यात आली आहे. अहिल्यानगरकडून येणाऱ्या वाहनांना नगर रोडने वाघोली, खराडी बायपास, शास्त्रीनगर चौक, गोल्फ क्लब चौक, आळंदी रोड जंक्शन, चंद्रमा चौक, पोल्ट्री चौक आणि हॅरीस ब्रिज मार्गाने जाता येईल.
सोलापूरकडून ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी मगरपट्टा, भैरोबानाला, लुल्लानगर चौक, गंगाधाम चौक आणि मार्केट यार्ड हा मार्ग खुला असेल. सातारा, सांगली आणि कोल्हापूरकडे जाणारी वाहने बेंगळुरू महामार्ग, नवले ब्रिज, कात्रज चौक आणि मार्केट यार्ड मार्गाचा वापर करतील. तसेच मुंबई आणि नाशिककडून येणाऱ्या वाहनांना हॅरीस ब्रिज, बोपोडी, चंद्रमा चौक, गोल्फ क्लब चौक ते मार्केट यार्ड असा मार्ग वापरावा लागेल.