DMart News: अवघ्या 10 मिनिटांत डिलिव्हरी देणाऱ्या झेप्टो आणि ब्लिंकिटच्या सुपरफास्ट वेगाला ब्रेक लावण्यासाठी आता डी मार्टने थेट औषध बाजारात दमदार प्रवेश केला आहे. स्वस्त दरात किराणामाल देऊन बाजारावर वर्चस्व गाजवणाऱ्या डी मार्टची मूळ कंपनी, ॲव्हेन्यू सुपरमार्ट्सने आता अत्यंत गुप्तपणे थेट फार्मसी रिटेल व्यवसायात पाऊल टाकले आहे.
मुंबई आणि आसपासच्या एमएमआर (MMR) भागातील निवडक स्टोअर्समध्ये कंपनीने हा नवा प्रायोगिक उपक्रम सुरू केला असून, आपल्या नेहमीच्या स्वस्ताईच्या पॅटर्ननुसार ग्राहकांना औषधांवर थेट 20% इतकी मोठी सरसकट सूट देण्यास सुरुवात केली आहे. घरपोच डिलिव्हरी देणाऱ्या क्विक कॉमर्स ॲप्सच्या वाढत्या प्रभावाच्या काळात डी मार्टची ही नवी शक्कल संपूर्ण गेम कसा बदलणार, याचीच चर्चा आता कॉर्पोरेट जगतात सुरू झाली आहे.
काय आहे नवी शक्कल?
हा नवा व्यवसाय वाढवण्यासाठी डी मार्टने एक अत्यंत हुशारीची रणनीती आखली असून त्यासाठी 'शॉप-इन-शॉप' हे मॉडेल वापरले आहे. औषध विक्रीसाठी बाजारात कोणतीही स्वतंत्र किंवा नवीन जागा भाड्याने न घेता, डी मार्टच्या ज्या स्टोअर्समध्ये ग्राहकांची सर्वात जास्त गर्दी असते, तिथेच आतमध्ये खास फार्मसी काऊंटर्स सुरू करण्यात आले आहेत.
यामुळे जागा खरेदीचा किंवा भाड्याचा कोट्यवधी रुपयांचा खर्च तर वाचला आहेच, पण त्याचसोबत डी मार्टमध्ये येणाऱ्यालाखो ग्राहकांपर्यंत कोणत्याही अतिरिक्त जाहिरातीशिवाय थेट पोहोचणे कंपनीला सहज शक्य झाले आहे. किराणा मालाप्रमाणेच येथेही 'एव्हरीडे लो प्रायसिंग' हीच रणनीती कायम ठेवून ग्राहकांना आकर्षित केले जात आहे.
( नक्की वाचा : Rental boyfriend : भारतात तासाच्या हिशोबाने बॉयफ्रेंड मिळायला सुरुवात, रेट कार्ड आणि अटी वाचल्या का? )
कमी नफ्याचा तोटा भरून काढण्यासाठी मोठी खेळी
या संपूर्ण खेळीमागे एका दगडात दोन पक्षी मारण्याचा डी मार्टचा उद्देश स्पष्ट दिसतो आहे. कंपनीचा मुख्य किराणा व्यवसाय हा केवळ 7% ते 8% ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिनवर चालतो, तर या उलट औषध विक्रीच्या व्यवसायात नफ्याचे प्रमाण खूप जास्त असते. ब्रँडेड जेनेरिक औषधांवर तर हे मार्जिन 25% ते 30% पर्यंत सहज जाते.
त्यामुळे किराणा व्यवसायातील कमी नफ्याची तूट भरून काढण्यासाठी फार्मसी क्षेत्र हा डी मार्टसाठी एक हुकमी एक्का ठरत आहे. या नव्या उपक्रमाची पूर्ण जबाबदारी ॲव्हेन्यू सुपरमार्ट्सची उपकंपनी असलेल्या रिफ्लेक्ट हेल्थकेअर अँड रिटेल प्रायव्हेट लिमिटेडकडे सोपवण्यात आली असून डी मार्टचे अनुभवी अधिकारी हितेश शहा या प्रकल्पाचे नेतृत्व करत आहेत.
( नक्की वाचा : महिन्याला 1 लाख रुपये कमावणाऱ्यांनाही शहरात मिळेना घर! रिअल इस्टेट मार्केटमधील नव्या ट्रेंडने वाढवली चिंता )
भविष्यात काय आव्हान?
औषध व्यवसायात नफा जास्त असला तरी त्यामध्ये हजारो वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचा साठा सायन्स आणि व्यवस्थापन करणे, तसेच ग्राहकांना हवी ती औषधे एकाच वेळी उपलब्ध करून देणे हे एक मोठे आव्हान असणार आहे.
सुरुवातीला दिलेली 20% सूट ग्राहकांना खूप आकर्षक वाटत असली तरीही, दीर्घकाळात या व्यवसायाचे यश हे डी मार्ट आपल्या सप्लाय चेनचा खर्च कसा नियंत्रित ठेवते आणि औषधांची विक्री किती मोठ्या प्रमाणात वाढवते यावरच अवलंबून राहील, असे मत उद्योग क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केले आहे. क्विक कॉमर्सच्या युगात स्वतःला वेगाने अपडेट ठेवण्यासाठी डी मार्टने टाकलेले हे पाऊल ग्राहकांना किती भावते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world