अविनाश पवार, प्रतिनिधी
Pune News : पुणे शहरात सध्या गाजत असलेल्या जैन बोर्डिंगच्या (Jain Boarding) जमिनीच्या वादाने आज (शनिवार, 25 ऑक्टोबर) पुन्हा एक मोठी कलाटणी घेतली आहे. या प्रकरणात वारंवार नाव घेतले जात असलेले केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी आज बोर्डिंगला भेट दिली. त्यावेळी जैन समुदाय (Jain Community) संतप्त झाला. 'या प्रकरणाचा निकाल पूर्णपणे तुमच्या बाजूने येईल, 1 तारखेपर्यंत पाहू,' असे आश्वासन मोहोळ यांनी जैन मुनिंसमोर दिले खरे, मात्र त्यानंतर संतप्त झालेल्या समुदायाने त्यांना थेट घेराव घालून 'उपोषणामध्ये सहभागी होणार का?' असा प्रश्न विचारला, ज्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
कधी वाढला तणाव?
गेल्या काही दिवसांपासून या संवेदनशील प्रकरणात खासदार मोहोळ यांच्यावर माजी आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) सातत्याने आरोप करत आहेत. याच पार्श्वभूमीवर, मोहोळ यांनी आज जैन बोर्डिंग परिसरातील जैन मंदिरात भेट दिली, जिथे जैन मुनिंचे प्रवचन सुरू होते.
यावेळी त्यांनी जैन समुदायासमोर पुढाकार घेत एक मोठे आश्वासन दिले: "मी एका ठराविक तारखेपर्यंत हा प्रश्न जैन समाजाला हवा तसा मार्गी लावणार आहे आणि या प्रकरणाचा निकाल पूर्णपणे तुमच्या बाजूने येईल, 1 तारखेपर्यंत पाहू." मात्र, त्यांच्या या वक्तव्यामुळे प्रश्न सुटण्याऐवजी जैन समुदायातील बांधवांचा संताप वाढला.
( नक्की वाचा : Pune News: मोहोळांची संपत्ती 400 पट वाढली? 'पांढऱ्या इनोव्हाचा उल्लेख करत धंगेकरांचा नवा बॉम्ब, पुण्यात खळबळ )
मोहोळ यांच्या आश्वासनावर संतप्त झालेल्या जैन समुदायातील काही सदस्यांनी त्यांना त्वरित घेराव घातला. उपस्थितांनी घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला आणि खासदारांना थेट प्रश्न विचारला, "29 तारखेपासून आम्ही सुरू करणार असलेल्या उपोषणात तुम्ही सामील होणार का?"
या अचानक झालेल्या घेरावामुळे आणि समुदायाच्या थेट प्रश्नांमुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अखेर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी खासदार मोहोळ यांना तिथून तातडीने काढता पाय घ्यावा लागला. जैन बांधवांनी जोरदार घोषणा देत आपला रोष व्यक्त केला, ज्यामुळे वातावरणाची तंगता स्पष्टपणे दिसून आली.
रवींद्र धंगेकरांचे आव्हान
दरम्यान, या सर्व घडामोडींवर माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे आणि मोहोळ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 'NDTV मराठी' शी बोलताना धंगेकर म्हणाले की"मोहोळ यांना अखेर 18 दिवसांचा वेळ का लागला? जैन बोर्डिंगच्या जमिनीची प्रक्रिया गोखले कन्स्ट्रक्शनकडून म्हणजेच विशाल गोखले यांच्या माध्यमातून झाली असताना, त्यांनी ताबडतोब निर्णय का घेतला नाही? आता जैन बांधव आक्रमक झाले आहेत. जर एका भगिनीने 'तुम्हीच जमीन विकली' असे धाडसाने म्हटले असेल, तर त्यात काही चुकीचे नाही. त्या भगिनीचे आम्ही कौतुक करतो, असं त्यांनी स्पष्ट केलं.
खासदार मोहोळ यांनी हा प्रश्न जैन समाजाच्या अपेक्षेप्रमाणे मार्गी लावला, तर आम्ही शनिवार वाड्यावर जिलेबीचे वाटप करू, असं आव्हान धंगेकर यांनी यावेळी दिलं.
जैन बोर्डिंगच्या जमिनीचा वाद आणि या प्रकरणातील राजकीय आरोप-प्रत्यारोप पुन्हा एकदा तापू लागले असून, 29 तारखेपासून सुरू होणाऱ्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आता पुढे या प्रकरणात काय घडते, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.