अविनाश पवार
पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की देशभरातील शहरी भागांमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांची चर्चा सुरू होते. दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च करूनही रस्ते लवकर खराब होतात. पुण्यासारख्या अनेक शहरांची ही एक मोठी समस्या आहे. पण याच देशात पुणे शहरामध्ये एक असा रस्ता आहे, ज्याने गेली 55 वर्षे कोणत्याही मोठ्या दुरुस्तीशिवाय, खड्ड्यांशिवाय आपली गुणवत्ता टिकवून ठेवली आहे. हा रस्ता म्हणजे पुणेकरांच्या अभिमानाचा विषय असलेला जंगली महाराज रोड (JM रोड). या रस्त्याने केवळ पुणेच नाही तर देशभरातील रस्ते निर्मितीमध्ये आदर्श निर्माण करून ठेवला आहे.
पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेला हा ऐतिहासिक रस्ता 2 किलोमीटर लांब आहे. तो जंगली महाराज मंदिरापासून डेक्कन जिमखाना परिसरापर्यंत हा रस्ता आहे. या रस्त्याचे बांधकाम 1970 साली सुरू करण्यात आले होते. 1976 मध्ये हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. 1976 पासून आजपर्यंत, या रस्त्यावर एकही मोठा खड्डा पडलेला नाही. तसेच, मोठ्या दुरुस्तीचीही कधी वेळ आली नाही. या रस्त्याच्या नावावर असलेला इतके वर्ष खड्डेमुक्त राहण्याचा रेकॉर्ड कोणीही तोडू शकलेला नाही. नाही म्हणायला काही वर्षांपूर्वी या रस्त्यावर रस्त्याच्या निर्मितीनंतर बांधलेल्या गटाराचे चेंबर खचलेले होते. मात्र ही व्यवस्था अलिकडच्या काळात करण्यात आली होती. मुख्य रस्ता हा खड्डेविरहीतच राहिलेला आहे. हा रस्ता केवळ खड्डेविरहित नाही, तर त्याचे बांधकामही अतिशय सुबक आणि दूरदृष्टीने केलेले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला रुंद फुटपाथ आहेत, ज्यामुळे पादचाऱ्यांसाठी चालणे सोपे होते. तसेच, सायकल ट्रॅकचीही सोय असल्याने आणि दुतर्फा चांगली झाडी असल्याने हा रस्ता अत्यंत सुंदर दिसतो. शिवाय पुण्याच्या सौंदर्यात भर घालणारा ठरतो.
नक्की वाचा - Pune News: पुणे महापालिकेत मनसेचा जोरदार राडा, नक्की काय घडलं?
रस्ता बांधणाऱ्या कंपनीनेच घातल्या अटी
या अनोख्या यशाचे श्रेय त्यावेळच्या पुणे महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष श्रीकांत शितोळे यांना जाते. त्यांनी या रस्त्याचे काम मुंबईस्थित रिकांडो या कंपनीला दिले होते. विशेष म्हणजे, हे कंत्राट केवळ 15 लाख रुपयांमध्ये आणि कोणत्याही पारंपरिक टेंडर प्रक्रियेशिवाय दिले गेले. त्यावेळी गुणवत्ता आणि कामाच्या शिस्तीवर कोणतीही तडजोड केली गेली नाही. गंमत अशी आहे की हा रस्ता बांधण्याचे काम ज्या रिकांडो कंपनीला देण्यात आले होते, त्या कंपनीनेच महापालिकेला काही अटी घातल्या होत्या. त्या अटी खालीलप्रमाणे होत्या.
- भविष्यात रस्ता पुन्हा खोदावा लागू नये अशी व्यवस्था करणे
- सर्व भूमिगत सुविधांसाठीसाठी आधीच व्यवस्था करणे
- ड्रेनेज लाईन, पाण्याची पाईपलाईन, इलेक्ट्रिक आणि केबल लाईन असा सुविधा भूमिगत करणे
- रस्त्यावर खिळा ठोकण्यास परवानगी न देणे
- कोणत्याही कामासाठी खोदकाम न करणे
श्रीकांत शितोळे यांनी या कामामध्ये कोणताही भ्रष्टाचार होणार नाही याची खात्री केली होती. “हा रस्ता भ्रष्टाचारमुक्त कामाचा एक उत्कृष्ट नमुना आहे,” असे त्यांनी अभिमानाने सांगितले होते. याच पारदर्शक आणि दर्जेदार कामामुळे JM रोड आजही जागतिक दर्जाचा रस्ता म्हणून ओळखला जातो.
नक्की वाचा - Pratap Sarnaik : ओला, उबर, रॅपिडोला जबरा पर्याय! आता एसटी महामंडळाचे 'छावा राइड' ॲप
भविष्यात असे रस्ते का झाले नाहीत?
अशा उत्कृष्ट कामाचा आदर्श असूनही, त्यानंतर पुण्यात किंवा देशाच्या इतर भागांत अशा प्रकारचे दीर्घकाळ टिकणारे रस्ते का तयार झाले नाहीत, हा प्रश्न अनेकांना पडतो. यामागे अनेक कारणे आहेत. JM रोडचे काम झाल्यानंतर पुण्यात राजकीय सत्तांतर झाले. महापालिकेतील अधिकारी बदलले आणि ज्या रिकांडो कंपनीने हे काम केले होते, तिच्यातही अंतर्गत वादामुळे फूट पडली. त्यानंतर येरवडा, औंध यांसारख्या भागांमध्ये स्थानिक ठेकेदारांना रस्त्यांची कामे देण्यात आली. पण ही कामे JM रोडसारखी दर्जेदार आणि दीर्घकाळ टिकणारी ठरली नाहीत. JM रोड हे केवळ एक यशस्वी बांधकाम नाही, तर ते दूरदृष्टीचे नियोजन, पारदर्शकता आणि कामाप्रती असलेली निष्ठा या मूल्यांचे प्रतीक आहे. JM रोड हा केवळ वाहतुकीसाठीचा रस्ता नसून तो एक आदर्श मॉडेल आहे.