
रेवती हिंगवे
पुणे महानगरपालिकेत आयुक्त नवल किशोर राम यांच्या दालना बाहेर मनसेनं आज चांगलाच राडा घातला. आयुक्तांच्या निवासस्थानातील 20 लाख रुपयांच्या वस्तू चोरीला गेल्या आहेत. त्या वस्तू कुठे गेल्या याचा जाब विचारायला मनसे कार्यकर्ते आयुक्तांच्या दालनात आले होते. पण जाब विचाराच्या आधीच आयुक्तांनी आम्हाला गुंड म्हणून आमच्याशी अरेरवी केल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. शिवाय शिवीगाळ ही केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे महापालिकेतील वातावरण तंग झालं होतं.
मनसे कार्यकर्त्यांनी दावा केली आहे की आम्हाला शिवीगाळ केली गेली. त्यानंतर भडकलेल्या मनसैनिकांनी आयुक्त नवल किशोर राम यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं. तब्बल 1.30 तास हे आंदोलन सुरू होत. शेवटी आयुक्त नवल किशोर राम यांनी मनसेच्या काही नेत्यांशी चर्चा केली. पण या चर्चेनंतर देखील तोडगा निघाला नाही. मनसे कार्यकर्ते मात्र आयुक्त दालनाच्या बाहेर आंदोलनावर ठाम होते.
नक्की वाचा - Pratap Sarnaik : ओला, उबर, रॅपिडोला जबरा पर्याय! आता एसटी महामंडळाचे 'छावा राइड' ॲप
यानंतर मात्र आंदोलन करणाऱ्या सर्व मनसैनिकांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं. आयुक्त जोपर्यंत माफी मागणार नाहीत तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन संपवणार नाही असा पवित्रा या मनसेच्या कार्यकर्त्यांनी घेतला होता. पण अखेर शेवटी या सगळ्या कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि मनसेच पालिकेतलं आंदोलन संपलं. या आंदोलनाची चर्चा संपूर्ण शहरात रंगली होती. त्याचे व्हिडीओ ही चांगलेच व्हायरल झाले.
या आंदोलनानंतर बोलताना आयुक्त नवल किशोर राम यांनी काही लोक माझ्या दालनात बैठक सुरू असताना आले. त्यांनी गोंधळ घालायला सुरू केला असं म्हटलं आहे. मी कुठलीही चुकीची भाषा वापरली नाही, एका अधिकाऱ्यांसोबत ते गुंडागिरी करत होते. म्हणून मी त्यांना गुंड म्हणालो असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. पण आयुक्तांनी गुंड बोलणं हे मनसैनिकांच्या मनाला लागलं आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world