रेवती हिंगवे, प्रतिनिधी
Pune Katraj Zoo Ticket Price Hike : भारतातील लोकप्रिय प्राणीसंग्रहालयांपैकी एक असलेलं पुण्यातील राजीव गांधी प्राणीसंग्रहालय येथील तिकीटदरात वाढ करण्यात आली आहे. पुण्याच्या पर्यटनात कात्रज प्राणीसंग्रहालयाचा महत्त्वाचा थांबा आहे. पुणे महापालिकेने प्राणीसंग्रहालयाचं तिकीट वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
७ वर्षांवंतर तिकीट दरात वाढ
पुणे महापालिकेच्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाचे तिकीट दर वाढविण्याच्या प्रस्तावास महापालिकेच्या स्थायी समितीत मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे सात वर्षांनंतर प्रवेश शुल्कात वाढ करण्यात आली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १ डिसेंबर २०२५ पासून केली जाणार आहे.
नक्की वाचा - Pune Weather : पुण्यात हुडहुडी, मुंबईकरांनींही स्वेटर काढले बाहेर; महाराष्ट्रभरात तापमानात मोठी घट
महापालिकेकडून प्राणीसंग्रहालयाच्या विस्ताराचे काम सुरू असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. या विस्तारीकरणानंतर झेब्रा, पिसोरी हरीण, लायन टेल्ड मकाक या नव्या प्रजातींसाठी प्रदर्शनं ठिकाणं उभारली जात आहेत. याशिवाय प्राण्यांच्या आहारासाठी, सेवकांचे वेतन, खंदक देखभाल-दुरुस्ती आणि मास्टर प्लॅननुसार विकास प्रकल्पांसाठी मोठा खर्च होत आहे. त्यामुळे तिकीट दरात वाढ केली आहे.
नवे तिकीट दर... (Pune Katraj Zoo New Ticket Price)
लहान मुलांचे तिकीट १० रुपयांवरून २० रुपये करण्यात आले आहे. प्रौढांचे तिकीट ४० रुपयांवरून ६० रुपये केले आहे, तर विदेशी नागरिकांचे तिकीट १०० वरून १५० रुपये करण्यात आले आहे. पालिकेच्या शाळा, जिल्हा परिषद आणि शासकीय शाळांच्या विद्यार्थ्यांचे तिकीट ५ वरून १० रुपये करण्यात आले आहे.