Pune Ketan Agarwal Case: पुण्यातील खळबळजनक केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला आता एक नवीन वळण मिळाले असून या संपूर्ण मॅचमेकिंग म्हणजेच लग्न जमवण्यामागे असलेल्या मित्तल कुटुंबाची भूमिका सध्या पोलिसांच्या तपासाच्या केंद्रस्थानी आली आहे. केतनचे सिया गोयलसोबत लग्न जमवण्यात तिचे मामा नरेंद्र मित्तल आणि मामी रेणू मित्तल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आपली भाची अशा प्रकारच्या क्रूर गुन्ह्यात सामील असेल, यावर त्यांचा अजूनही विश्वास बसत नाहीये.
पोलीस तपासाचा भाग म्हणून या दांपत्याने नुकतीच पोलिसांसमोर हजेरी लावली आणि त्यांचे जबाब नोंदवले. यावेळी त्यांनी सांगितले की, सिया तिचे लग्न मोडू इच्छिणाऱ्या प्रियकराच्या म्हणजेच चेतन चौधरीच्या मदतीने एवढे मोठे पाऊल उचलेल, अशी त्यांनी कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती.
सियाच्या मामा-मामींना कल्पना होती?
पोलिसांना दिलेल्या जबाबात नरेंद्र मित्तल यांनी सांगितले की, सिया आणि केतन दोघेही अत्यंत सुस्वभावी, नम्र आणि चांगल्या वर्तनाचे होते. आम्ही सियाला लहानपणापासून पाहिले आहे, त्यामुळे ती असे काही करेल असे आम्हाला कधीच वाटले नव्हते. गोयल कुटुंबातील इतर सदस्यांप्रमाणेच या दोघांनाही सिया आणि चेतन यांच्यातील प्रेमसंबंधांची पुसटशीही कल्पना नव्हती.
दरम्यान, केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली, ज्यामध्ये त्यांनी आरोप केला आहे की मामी रेणू मित्तल यांनी सियाची पूर्ण हमी घेतली होती, म्हणूनच ते या लग्नासाठी तयार झाले होते. एवढेच नाही तर आरोपीच्या कुटुंबाला तिच्या या प्रेमसंबंधांची आधीपासूनच माहिती होती, असा खळबळजनक संशयही केतनच्या वडिलांनी व्यक्त केला आहे.
( नक्की वाचा : Ketan Agarwal Murder: केतन अग्रवालच्या हत्येचा रश्मिकाच्या सिनेमाशी संबंध काय? सोशल मीडियावर पेटलाय नवा वाद )
कधी सुरु झाली लग्नाची चर्चा?
नरेंद्र मित्तल यांनी पोलिसांना सांगितले की, दोन्ही कुटुंबांमध्ये केतन आणि सियाच्या लग्नाची चर्चा जानेवारी 2026 मध्ये सुरू झाली होती. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात अत्यंत थाटामाटात या दोघांचा साखरपुडा पार पडला आणि आगामी नोव्हेंबर महिन्यात त्यांचा भव्य विवाह सोहळा नियोजित होता. या संपूर्ण प्रकरणातील आपली भूमिका केवळ दोन्ही कुटुंबांची ओळख करून देणे आणि लग्नासाठी बैठक घडवून आणण्यापुरतीच मर्यादित होती, असे मित्तल यांनी स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे, पोलिसांनी घेतलेल्या चौकशीत आरोपी सिया गोयलने आपला गुन्हा कबूल केला असून, घरच्यांशी थेट चर्चा करून लग्न मोडण्यापेक्षा केतनचा खून करणे तिला अधिक सोपे वाटले, अशी धक्कादायक कबुली तिने दिली आहे. कुटुंबाच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून तिने लग्न नाकारण्याऐवजी होणाऱ्या पतीलाच संपवण्याचा क्रूर निर्णय घेतला.
( नक्की वाचा : महाल बुकींग आणि प्रायव्हेट जेटची चर्चा विसरा, पुण्याच्या केतन अग्रवाल हत्याकांडात सियाने टाकला नवा डाव )
क्रिकेट मॅचदरम्यान झाली होती चेतनशी ओळख
सियाचा भाऊ साहिल याने पोलिसांना सांगितले की, सिया आणि मुख्य आरोपी चेतन चौधरी यांची पहिली भेट एका क्रिकेट मॅचदरम्यान झाली होती आणि त्यानंतर त्यांच्यात जवळीक वाढली. दुसरीकडे, सिया दोषी असेल तर तिला थेट फासावर लटकवावे, अशी संतप्त प्रतिक्रिया तिच्या पालकांनी दिली असून त्यांनी चेतनला कधीही पाहिले किंवा ओळखले नसल्याचा दावा केला आहे.
केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी सांगितले की, त्यांच्या मुलालाही या प्रेमसंबंधांची माहिती नव्हती, पण सियाचा फोन दररोज कित्येक तास व्यस्त असायचा, अशी शंका केतनने एकदा बोलून दाखवली होती. गेल्या 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावरून ट्रेकिंगदरम्यान सियाने प्रियकराच्या मदतीने केतनला 400 फूट खोल दरीत ढकलून दिले होते. या प्रकरणाचा सखोल तपास सध्या पोलीस करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world