Pune Mumbai Dam Water Level: पुणे, मुंबईकरांची चिंता मिटली? धरणांमध्ये किती पाणीसाठा? आकडेवारी समोर

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या पाण्याच्या साठ्यात मोठी वाढ झाली आहे. तर णे व परिसरातील धरण क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण 100% भरले.

जाहिरात
Read Time: 2 mins

पुणे जिल्हा आणि घाटमाथ्यावर मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणारी प्रमुख धरणे वेगाने भरू लागली आहेत. जलसंपदा विभागाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार, आज शुक्रवार, 24 जुलै रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत खडकवासला धरण 100 टक्के भरले आहे.

धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात 9405 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गाची क्षमता आणखी वाढवण्याची शक्यता आहे.

Advertisement

धरणनिहाय पाणीसाठा (24 जुलै, सकाळी 6 वाजता)

  • खडकवासला - 100 टक्के
  • वरसगाव - 76.88 टक्के
  • पानशेत - 82.32 टक्के
  • टेमघर - 61.68 टक्के
  • पवना - 94.73 टक्के
  • मुळशी - 84.16 टक्के 

(नक्की वाचा-  VIDEO: मस्ती जिरली! महिला आंदोलकाच्या कानाखाली मारणाऱ्या DCP ला दणका; हायकोर्टाच्या ताशेऱ्यांनंतर कारवाई)

चार दिवसांपासून मुसळधार 

पुणे जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून पाऊस सुरू असून दमदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यात 17 ते 38 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर ताम्हणी घाटात सर्वाधिक 280 मिलिमीटर पावसाची काल नोंद झाली आहे.  घाट माथ्यावर सर्व भागात अतिवृष्टी  झाली आहे. तिथे सरासरी 100 ते 280 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला आहे

प्रशासनाचा नदीकाठच्या रहिवाशांना इशारा

खडकवासला आणि मुळशी धरणातून विसर्ग सुरू झाल्याने मुठा नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. पुणे महापालिका आणि पाटबंधारे विभागाने भिडे पूल, गरवारे कॉलेज परिसर, डेक्कन कॉझवे आणि नदीकाठच्या सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. नदीपात्रात पार्क केलेली वाहने तात्काळ हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मुंबईच्या धरणांतील पाणीसाठ्यातही वाढ

मुंबईला दररोज पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांपैकी मोडक सागर, विहार आणि तुळशी ही तीन धरणे पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहत आहेत. सातही धरणांमध्ये सध्या 77.62% उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे.

(नक्की वाचा-  IAS Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या भीतीने जिलबीने बदलला रंग; नेमकं काय घडलंय?)

मुंबईच्या सात तलावांमधील पाणीसाठा (24 जुलै, सकाळी 6 वाजता)

  • अप्पर वैतरणा - 62.97
  • मोडक सागर - 100
  • तानसा - 98.77
  • मिडल वैतरणा - 75.14
  • भातसा - 73.51
  • विहार  - 100
  • तुळशी  - 100
     

Topics mentioned in this article