जाहिरात

IAS Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या भीतीने जिलबीने बदलला रंग; नेमकं काय घडलंय?

IAS Tukaram Mundhe: अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या मोहिमेमुळे मिठाई विक्रेत्यांनी कृत्रिम रंगांचा वापर थांबवल्याचे यावरून समोर आले आहे.

IAS Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या भीतीने जिलबीने बदलला रंग; नेमकं काय घडलंय?

खाद्यपदार्थांमधील भेसळ आणि असुरक्षित घटकांविरोधात महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) उगारलेल्या बडग्याचा परिणाम आता थेट लोकांच्या ताटात दिसू लागला आहे. मुंबईतील एका रहिवाशाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर आपल्या रोजच्या दुकानातील जिलबीचा नेहमीचा चमकदार नारंगी रंग गायब झाल्याचा अनुभव शेअर केला आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईमुळेच दुकानदारांनी रासायनिक रंगांचा वापर टाळल्याचे या नागरिकाने म्हटले असून, ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत आहे.

नागरिकाची व्हायरल पोस्ट नक्की काय?

मुंबईतील या युझरने 'X' वर जिलबीचा फोटो शेअर करत लिहिले की, "आज माझ्या मुलाने नेहमीच्या दुकानातून जिलबी आणली. आधी या जिलबीला मूळ नारंगी रंग असायचा, पण आज तो रंग पूर्णपणे गायब झाला आहे. हे सर्व एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कारवाईमुळे झाले आहे. सर्व हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांना काय करावे आणि काय करू नये याचा चांगला धडा मिळाला आहे."

या पोस्टनंतर सोशल मीडियावर अन्नातील भेसळ, कृत्रिम रंग आणि अन्न सुरक्षेबाबत देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

(नक्की वाचा-  VIDEO: मस्ती जिरली! महिला आंदोलकाच्या कानाखाली मारणाऱ्या DCP ला दणका; हायकोर्टाच्या ताशेऱ्यांनंतर कारवाई)

तुकाराम मुंढेंची 'सुरक्षित अन्न, सुरक्षित औषधे' मोहीम

महाराष्ट्राच्या एफडीए आयुक्तपदाची सूत्रे मे महिन्यात हाती घेतल्यानंतर सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळमुक्त ही मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेअंतर्गत अन्न भेसळ, अवैध गुटखा नेटवर्क आणि अस्वच्छ हॉटेल्सवर धडक कारवाया केल्या जात आहेत.

दोन महिन्यांतील कारवाईचा धावता आढावा

25 मे पासून एफडीएच्या पथकांनी दररोज सरासरी 20 पेक्षा जास्त तपासण्या करून राज्यभरात तब्बल 1131 धाडी घातल्या आहेत. या कारवाईत 49.57 कोटी रुपये मूल्याचा भेसळयुक्त आणि अवैध अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. भेसळयुक्त असल्याचा संशय असलेले तब्बल 1.6 लाख लिटर दूध जप्त करून नष्ट करण्यात आले.

(नक्की वाचा- Ketan Agrawal Case: केतनचा जीव वाचला असता; सिया आणि चेतनने पोलिसांना सांगितला 'प्लॅन A')

56 हॉटेल्सचे परवाने निलंबित 

नियम धाब्यावर बसवणाऱ्या आणि अस्वच्छता बाळगणाऱ्या 56 हॉटेल्स व उपाहारगृहांचे परवाने थेट निलंबित करण्यात आले आहेत. संघटित गुटखा सिंडिकेट आणि तस्करांवर 'मोक्का'सारख्या कठोर कायद्यान्वये कारवाई सुरू करण्यात आली आहे. एफडीएच्या या आक्रमक पवित्र्यामुळे राज्यातील मिठाई विक्रेते, हॉटेल व्यावसायिक आणि अन्न उत्पादकांचे धाबे दणाणले असून कृत्रिम आणि अपायकारक रंगांचा वापर मोठ्या प्रमाणात थांबल्याचे चित्र मुंबईत पाहायला मिळत आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com