Pune News: पुणे-लोणावळा रेल्वे मार्गाची क्षमता संपली! 88 टक्के ट्रॅक फुल्ल, वाचा काय होणार प्रवासावर परिणाम

Pune Lonavala Railway: पुणे आणि लोणावळा दरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक काळजीची बातमी आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Pune Lonavala railway track : मुंबई ते चेन्नई या महत्त्वाच्या रेल्वे मार्गावरील हा अत्यंत कळीचा टप्पा आहे
पुणे:

Pune Lonavala Railway:  पुणे आणि लोणावळा दरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक काळजीची बातमी आहे. या मार्गावरील रेल्वे रुळांची धावण्याची क्षमता आता जवळपास संपत आली असून, प्रशासनाने धोक्याची घंटा वाजवली आहे. सध्या या मार्गाचा वापर इतका प्रचंड वाढला आहे की, नवीन लोकल ट्रेन सुरू करणे तर सोडाच, पण असलेल्या गाड्या वेळेवर चालवणे देखील रेल्वे प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे.

नेमकं काय घडलंय?

मुंबई ते चेन्नई या महत्त्वाच्या रेल्वे मार्गावरील पुणे-लोणावळा हा अत्यंत कळीचा टप्पा आहे. एप्रिल 2026 च्या ताज्या आकडेवारीनुसार, या मार्गावर उपलब्ध क्षमतेच्या तब्बल 88 टक्के वापर होत आहे. सध्या या मार्गावर दिवसाला सरासरी 158 रेल्वे गाड्या धावत आहेत. रुळांची क्षमता आणि गाड्यांची संख्या यात आता केवळ 12 टक्क्यांचे अंतर उरले असून, यामध्ये रेल्वेच्या देखभालीसाठी लागणारा वेळही समाविष्ट आहे.'सकाळ' ने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Advertisement

( नक्की वाचा : Mumbai Local: दादर, कुर्ल्याची गर्दी विसरा!आता लोकलने बोरिवली ते पनवेल थेट प्रवास!जाणून घ्या काय आहे प्लॅन )
 

प्रवाशांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागणार?

रेल्वे रूळ फुल्ल झाल्याचा थेट परिणाम आता प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासावर होऊ लागला आहे. या मार्गावर नेमक्या कोणत्या अडचणी येत आहेत, ते पाहूया

नवीन लोकलला ब्रेक: प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली, तरी रुळांवर जागाच नसल्यामुळे रेल्वेला नवीन लोकल फेऱ्या वाढवता येत नाहीत. सणासुदीच्या काळात विशेष गाड्या सोडताना प्रशासनाची मोठी दमछाक होत आहे.

गाड्यांचा लेटमार्क: क्षमतेपेक्षा जास्त गाड्या एकाच मार्गावर असल्याने, जर एका गाडीला थोडाही विलंब झाला, तर तिच्या मागे येणाऱ्या सर्व गाड्यांचे वेळापत्रक कोलमडते. यामुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाया जात आहे.

देखभालीसाठी वेळ नाही: रेल्वेचे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायर सुरक्षित ठेवण्यासाठी दररोज ठराविक वेळ गाड्या थांबवून दुरुस्ती (ब्लॉक) करणे गरजेचे असते. मात्र, गाड्यांची वर्दळ इतकी आहे की देखभालीसाठी पुरेसा वेळ मिळत नाही, ज्यामुळे तांत्रिक बिघाड वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

Advertisement

मालगाड्यांचा खोळंबा: प्रवासी गाड्यांना वाट करून देण्यासाठी अनेकदा मालगाड्यांना तासनतास साईड ट्रॅकवर (लूप लाईन) उभे करून ठेवावे लागते.

प्रशासनाचे म्हणणे काय?

पुणे रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी हेमंत कुमार बेहरा यांनी सांगितले की, पुणे-लोणावळा मार्गाचा 88 टक्के वापर होत आहे. रेल्वे सुरक्षितपणे चालवण्यासाठी रुळांची देखभाल करणे अनिवार्य असून त्यासाठी ब्लॉक घ्यावाच लागतो. सर्व प्रवासी रेल्वे वेळेवर चालवण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

( नक्की वाचा : काय आहे BH सीरिजची नंबर प्लेट? कुणाला मिळते आणि काय आहेत फायदे? सोप्या शब्दात समजून घ्या सर्व माहिती )

थोडक्यात सांगायचे तर, पुणे-लोणावळा मार्गावर आता 'तिळमात्र' जागा उरलेली नाही. या मार्गाचे विस्तारीकरण किंवा तिसऱ्या आणि चौथ्या लाईनचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत नवीन लोकलचे स्वप्न पूर्ण होणे कठीण दिसत आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article