Pune Mayor News: पुणे महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजेपासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. निवडणुकीच्या दिवशी सभा सुरू झाल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटांची मुदत दिली जाते. यानंतर महापौरपदासाठीचे मतदान प्रक्रिया पार पडेल. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे 119 नगरसेवक निवडून आले आहेत, येथे भाजपची एकहात्ती सत्ता आलीय. पुण्याचे महापौरपद सर्वसाधारण गटातील महिलेसाठी राखीव झाले आहे. त्यामुळे पुण्याच्या महापौरपदाची माळ महिला उमेदवाराच्या गळ्यात पडणार हे निश्चित झाले आहे. महापालिका निवडणुकीत भाजपने मोठ्या प्रमाणात महिलांना उमेदवारी दिली होती. 119 महिलांना संधी देण्यात आली असून त्यापैकी 50 पेक्षा अधिक महिला नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.
पुणे महापौर निवडणूक: कोणाच्या नावांची चर्चा?
रंजना टिळेकर, मंजुषा नागपुरे, मानसी देशपांडे, रोहिणी चिमटे या उमेदवारांची नावं चर्चेत आहेत. मानसी देशपांडे यांनी विजयाची हॅटट्रिक केलीय, त्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या नातेवाईक आहेत. तर मंजुषा नागपुरे यांनी बिनविरोध विजय मिळवला होता. रंजना टिळेकर या आमदार योगेश टिळेकर यांच्या आई आहेत, त्यांची ही सहावी टर्म आहे.
पुण्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?
- भाजप :119
- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : 27
- काँग्रेस : 15
- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : 3
- शिवसेना (UBT) : 01