Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार शनिवार (31 जानेवारी) संध्याकाळी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (राकाँपा) सूत्रांनी दिलीय. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संसदीय मंडळाची उद्या (31 जानेवारी) बैठक होणार आहे. जेथे सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली जाईल. उद्या संध्याकाळपर्यंत त्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील अशी शक्यता आहे",अशी माहिती सूत्रांनी दिलीय. अजित पवार यांच्या अकाली झालेल्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची समीकरणं बदलताना दिसत आहेत. यादरम्यानच अजित पवार यांनी सुनेत्रा पवारांबाबत केलेले विधान व्हायरल होतंय.
सुनेत्रा पवारांबाबत अजित पवार काय म्हणाले?
'Pune Civic Mirror' या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्याबाबत मांडलेले मत सोशल मीडियावर व्हायरल होतंय. सुनेत्रा पवार यांच्याबाबत स्पष्ट मत विचारले असता अजित पवार म्हणाले होते की, "ती तिच्यावरील जबाबदारी तिच्या पद्धतीने पार पाडते, असं तिचं काम आहे. जबाबदारी पार पाडते, म्हणजे सर्वच आले."
(नक्की वाचा: Ajit Pawar News: तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय... Love U दादा!, रोहित पवारांची पोस्ट वाचून रडू आवरणार नाही)
पार्थ पवारांबाबत स्पष्टच अजित पवार म्हणाले
पार्थ पवार यांच्याबाबत अजित पवार म्हणाले की, "त्याने काही गोष्टी थोड्या बदलल्या पाहिजे, असे माझं स्वतःचं मत आहे. एकदम रिअॅक्ट होणे, कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवणे. अलिकडे स्पर्धेच्या युगात तुम्हाला टिकायचं असेल तर अंधश्रद्धेसारखा विश्वास ठेवून चालत नाही. माणसं ओळखायला किंवा त्याच्यामध्ये याचा नक्की हेतू काय आहे? ते समजून घ्यायला शिकलं, पाहिजे प्रयत्न केला पाहिजे".
(नक्की वाचा: Ajit Pawar News:अजितदादांचा पहाटेचा शपथविधी हा पहिला प्रयोग नव्हता तर... रावसाहेब दानवेंनी सांगितली Inside Story)
सुप्रिया सुळेंचे केलं कौतुकखासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अजित पवार म्हणाले की, "सुप्रियाचे पार्लमेंटमध्ये अतिशय उत्तम काम आहे, कुठल्याही विषयावर ती बोलायला उठली की फार बारकाईने त्याच्यातील वीक पॉइंट पण ती मांडते, काय करायला पाहिजे तेही ती सांगण्याचा प्रयत्न करते आणि वेगळी ओळख तिनं दिल्लीमध्ये निर्माण केलीय. अनेक वेगवेगळे खासदार हे त्यांचे एकमेकांसोबत बसणं उठणं, त्यामध्ये फक्त राजकीयच फायदा उठवणे असे नाहीय. तर सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवणे हे तिनं उत्तम पद्धतीने निभावलंय".
(नक्की वाचा: Ajit Pawar Plane Crash Accident: अजित पवारांचा अपघात की घातपात? लोकांच्या मनातील कलह दूर करावा: विजय वडेट्टीवार)
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणालेदुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होतील का? असे विचारले असता ते म्हणाले की, "कुठलाही निर्णय घ्यायचा असेल, तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल, त्याच्या पाठीशी आम्ही सरकार म्हणून आणि भाजप म्हणून ठामपणे उभे राहू. त्यामुळे मी सध्या एवढेच सांगू शकतो की, अजितदादांचे कुटुंब असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, त्यांच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे उभे आहोत. त्यांच जो काही निर्णय होईल, त्यांना योग्य ते समर्थन आमच्याकडून दिले जाईल. माझ्याशी दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चर्चा करून गेले आहेत. त्यांच्या पक्षाची कार्यपद्धती काय आहे, कोणते पर्याय आहेत, याबाबत त्यांनी चर्चा केली आहे. मात्र अंतिम निर्णय त्यांचा पक्ष घेईल. त्या संदर्भात यापेक्षा अधिक माझ्याकडे माहिती नाही".
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world