Pune Metro Expansion: पुणेकरांसाठी विशेषतः नगर रोडवरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. नगर रोडवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता कायमचा सुटण्याच्या दिशेने महामेट्रोने मोठे पाऊल उचलले आहे. रामवाडी ते तुळजाभवानी नगर दरम्यान 4.7 किलोमीटर लांबीचा एक भव्य डबल डेकर फ्लायओव्हर आणि मेट्रो मार्ग उभारण्याचे काम आता अधिकृतपणे सुरू झाले आहे. यामुळे आयटी पार्क्स, व्यावसायिक केंद्रे आणि निवासी भागांना जोडणाऱ्या या मार्गावर प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.
नगर रोडवर मेट्रोच्या कामाला सुरुवात
पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाला आता गती मिळाली असून रामवाडीपासून या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे हा मार्ग डबल डेकर स्वरूपाचा असेल. यामध्ये खालच्या थरावर सहा पदरी उड्डाणपूल असेल आणि त्याच्या वरच्या थरावर मेट्रो धावेल. पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक अतुल गडगीळ यांनी या कामाला सुरुवात झाल्याच्या वृत्ताला 'इंडियन एक्स्प्रेस' शी बोलताना दुजोरा दिला आहे. मेट्रो स्थानके ही उड्डाणपुलाच्या वरच्या बाजूला बांधली जाणार असल्याने हे काम तांत्रिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक आणि भव्य असणार आहे.
( नक्की वाचा : Pune News: पुणे स्टेशनवर आता नो गर्दी, नो गोंधळ, रेल्वे प्रशासनाचा मोठा 'गेम चेंजर' प्रकल्प! वाचा सविस्तर )
प्रकल्पाचे स्वरूप आणि रचना
हा नवीन उन्नत मार्ग रामवाडी ते तुळजाभवानी नगर असा 4.7 किलोमीटरचा असेल. यामध्ये विमान नगर येथे विमानतळाकडे जाणारा एक फाटा (Spur Line) देखील असणार आहे. पहिल्या स्तरावर बांधल्या जाणाऱ्या सहा पदरी उड्डाणपुलाची उंची किमान 5.5 मीटर ठेवली जाईल, जेणेकरून त्यावरून मेट्रोचे बांधकाम सुरक्षितपणे करता येईल. विशेष म्हणजे, भविष्यात गरज भासल्यास या सहा पदरी उड्डाणपुलाचा विस्तार आठ पदरी मार्गापर्यंत करण्याची तरतूदही यामध्ये करण्यात आली आहे.
चार नवीन मेट्रो स्थानकांचा समावेश
या नवीन मार्गावर एकूण चार महत्त्वाची मेट्रो स्थानके असतील. यामध्ये विमाननगर, सोमनाथनगर, खराडी बायपास आणि तुळजाभवानी नगर या ठिकाणांचा समावेश आहे. या स्थानकांचे प्लॅटफॉर्म, कॉनकोर्स गर्डर आणि डेक स्लॅबचे काम अत्यंत नियोजित पद्धतीने केले जाणार आहे.
रेल्वे मार्ग, अस्तित्वात असलेले रस्ते आणि सार्वजनिक सेवांना कोणताही अडथळा येणार नाही, याची काळजी घेत हे बांधकाम केले जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
( नक्की वाचा : Solapur News : पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन, सोलापूरसाठी प्रगतीचे वरदान; असा होणार मोठा फायदा )
पुणे मेट्रोचा विस्तार आणि भविष्य
केंद्र सरकारने वनाज ते रामवाडी या मार्गाचा विस्तार चांदणी चौक आणि वाघोलीपर्यंत करण्यास यापूर्वीच मंजुरी दिली आहे. सध्याचे काम हे रामवाडी ते तुळजाभवानी नगर या दरम्यान केंद्रित असेल. यासोबतच वनाज मार्गाचा 1.1 किलोमीटर विस्तार चांदणी चौकापर्यंत केला जात असून तिथे कोथरूड डेपो आणि चांदणी चौक ही दोन नवीन स्थानके असतील. सध्या पुणे मेट्रो वनाज ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या दोन मुख्य मार्गांवर धावत असून, या विस्तारामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे.