Pune News: पुणे मेट्रोचा धमाका! कॅम्प, पुलगेटमार्गे थेट उंड्री गाठता येणार, वाचा कुठून जाणार ट्रेन

Pune Metro News: पुणेकरांसाठी विशेषतः दक्षिण पुण्यात राहणाऱ्या नागरिकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे

जाहिरात
Read Time: 3 mins
Pune Metro News: सुमारे 20 किलोमीटर लांबीचा हा मेगा प्लॅन तयार झाला आहे.
पुणे:

Pune Metro News: पुणेकरांसाठी विशेषतः दक्षिण पुण्यात राहणाऱ्या नागरिकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कोंढवा, येवलेवाडी आणि उंड्री यांसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या भागांतील वाहतूक कोंडीतून आता लवकरच कायमची सुटका होणार आहे. 

महामेट्रोने शिवाजीनगर ते येवलेवाडी दरम्यान मेट्रो मार्गिका विस्ताराचा एक महत्त्वाकांक्षी आराखडा तयार केला असून, या प्रकल्पामुळे दक्षिण पुण्याचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार आहे. सुमारे 20 किलोमीटर लांबीचा हा मेगा प्लॅन तयार झाला असून, यामुळे प्रवाशांचा प्रवास केवळ वेगवानच होणार नाही, तर तो अधिक सुखकरही होणार आहे.

कसा आहे मार्ग?

महामेट्रोच्या या नवीन प्रस्तावानुसार, शिवाजीनगर ते येवलेवाडी दरम्यान साधारण 20 किलोमीटर लांबीची उन्नत म्हणजेच इलेव्हेटेड मेट्रो मार्गिका उभारली जाणार आहे. सध्या या भागातील नागरिकांना शहराच्या मध्यवर्ती भागात जाण्यासाठी तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. 

मात्र, मेट्रोचे जाळे विस्तारल्यामुळे हा प्रवास मिनिटांत पूर्ण करणे शक्य होईल. महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर सर्व तांत्रिक प्रक्रिया आणि मंजुऱ्या वेळेत मिळाल्या, तर 2030-31 पर्यंत ही मार्गिका प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Advertisement

(नक्की वाचा : Pune News : पुणेकरांनो सुटका झाली, हिंजवडी मेट्रो धावली! 23 किलोमीटर प्रवासातील सर्व स्टेशन्स कोणती? पहा VIDEO )

हिंजवडी-शिवाजीनगर मार्गिकेचा पुढचा टप्पा

हा प्रस्तावित विस्तार म्हणजे केवळ एक स्वतंत्र मार्ग नसून, तो हिंजवडी ते शिवाजीनगर या 23 किलोमीटर लांबीच्या मार्गिकेचा पुढचा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. हिंजवडी-शिवाजीनगर हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी म्हणजेच PPP तत्त्वावर साकारला जात आहे. 

आता या मार्गिकेला पुढे नेऊन थेट दक्षिण पुण्याशी जोडले जाणार आहे. विशेष म्हणजे, शिवाजीनगर ते येवलेवाडी या दरम्यानची ही मेट्रो मार्गिका कॅम्प आणि पुलगेट मार्गे जाणार आहे. यामुळे शहराचा जुना मध्यवर्ती भाग आणि दक्षिणेकडील उपनगरे एकमेकांना थेट जोडली जातील.

Advertisement

कोंढवा आणि येवलेनगरसाठी महामेट्रोचा विशेष पुढाकार

शिवाजीनगर ते येवलेवाडी या प्रकल्पातील कोंढवा ते येवलेनगर या टप्प्याचे काम थेट महामेट्रो स्वतःच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करणार आहे. या नियोजित मार्गामध्ये एक अतिरिक्त स्पर म्हणजेच फाटा देऊन तो उंड्रीपर्यंत नेण्याचाही विचार सुरू आहे. 

यामुळे कोंढवा, येवलेवाडी, येवलेनगर आणि उंड्री या चारही प्रमुख भागांतील नागरिकांना मेट्रोचा लाभ घेता येईल. या प्रकल्पामुळे दक्षिण पुण्यातील वाढत्या लोकसंख्येला सार्वजनिक वाहतुकीचा एक सक्षम पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे.

Advertisement

भविष्यातील नियोजन काय?

या प्रस्तावित मार्गिकेला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच DPR तयार करण्याचे काम हाती घेतले जाईल. त्यानंतर पर्यावरणीय आणि तांत्रिक सर्वेक्षण पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल. सध्या दक्षिण पुण्यात ज्या पद्धतीने नागरीकरण वाढले आहे, त्या तुलनेत रस्त्यांची रुंदी कमी पडत असल्याने मेट्रो हाच या भागासाठी शाश्वत उपाय मानला जात आहे. या 20 किलोमीटरच्या नवीन मार्गिकेमुळे पुणेकरांची केवळ वेळेचीच बचत होणार नाही, तर इंधन आणि प्रदूषणाची समस्याही कमी होण्यास मदत होईल.

Topics mentioned in this article