सूरज कसबे, प्रतिनिधी
Pune Metro News: हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कला पुण्याच्या मध्यवर्ती भागाशी जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित 'हिंजवडी ते शिवाजीनगर' (मेट्रो मार्गिका 3) प्रकल्पाबाबत एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. या मेट्रो मार्गिकेचे लोकार्पण 15 जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात ही मेट्रो माण ते रामनगर बाणेर दरम्यान एकूण 12 स्टेशन्सवरून धावणार आहे. यामुळे आयटी पार्कमध्ये जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांचा रोजचा प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (PMRDA) आयुक्त अभिजीत चौधरी यांनी या महत्त्वपूर्ण नियोजनाची अधिकृत माहिती दिली आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो 15 जुलैपासून सुरू?
या मेट्रो मार्गिकेच्या प्रत्यक्ष सुरक्षेची आणि तांत्रिक बाबींची पाहणी करण्यासाठी 15 जून ते 20 जून दरम्यान मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांची (CMRS) तारीख मिळाली आहे. सुरक्षा आयुक्तांच्या ग्रीन सिग्नलनंतरच मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. या प्रकल्पाचे काम करणाऱ्या 'पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड' या कंपनीला 30 जूनपर्यंत सर्व आवश्यक कामे पूर्ण करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. जूनअखेर काम पूर्ण झाल्यानंतर, पावसाळ्यातील संभाव्य अडचणी आणि तांत्रिक चाचण्यांचा अंदाज घेऊन 15 जुलैपासून ही सेवा प्रत्यक्ष प्रवाशांसाठी खुली करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.
(नक्की वाचा : Dharashiv News: "शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोफत देतो, पण...", शेतकऱ्याच्या एका अटीचा तुम्हालाही अभिमान वाटेल)
सार्वजनिक-खासगी भागीदारीतून साकारणारा प्रकल्प
सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (PPP Model) साकारला जाणारा हा पुण्याचा तिसरा मेट्रो प्रकल्प आहे. या संपूर्ण प्रकल्पाची एकूण लांबी 23.5 किलोमीटर असून यामध्ये एकूण 23 स्टेशन्सचा समावेश आहे. आजवर विविध तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे या मेट्रोचे तब्बल आठ मुहूर्त हुकले आहेत. पण आता प्रशासनाने संपूर्ण मार्गिका सुरू करण्यासाठी कालबद्ध नियोजन केले आहे.
(नक्की वाचा : Pimpri Chinchwad News: पिंपरी-चिंचवडकरांवर येणार जलसंकट? मान्सून लांबल्यास शहरात तीव्र पाणीटंचाईचे सावट)
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकल्प खालील टप्प्यांत पूर्ण केला जाईल:
- पहिला टप्पा (15 जुलै): माण ते रामनगर बाणेर दरम्यान 12 स्टेशन्स प्रवाशांसाठी खुली केली जातील.
- दुसरा टप्पा (डिसेंबर 2026): हाय स्ट्रीट बाणेर ते शिवाजीनगर दरम्यानची उर्वरित 11 स्थानके डिसेंबरअखेर प्रवाशांच्या सेवेत येतील. म्हणजेच डिसेंबर 2026 पर्यंत संपूर्ण मार्गिका पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल.
- अंतिम टप्पा (मार्च 2027): मेट्रो संदर्भातील इतर किरकोळ आणि सुशोभिकरणाची कामे मार्च 2027 पर्यंत पूर्ण केली जातील.
पहिल्या टप्प्याची सुरुवात झाल्यानंतर उर्वरित कामांना आणखी गती दिली जाणार असल्याचे आयुक्त अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी लक्षात घेता 15 जुलैपासून सुरू होणारा हा पहिला टप्पा पुणेकर आणि विशेषतः आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.