Pune Metro : पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा-2 च्या विस्तारित मार्गावर स्वारगेट ते कात्रज या कॉरिडॉरवर दोन नवीन स्थानके उभारण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. बालाजीनगर व बिबेवाडी येथे ही दोन मेट्रो स्थानके उभारली जाणार असून त्यासाठी येणाऱ्या 683.11 कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चास तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे.
पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा-2 च्या विस्तारित मार्गावर स्वारगेट ते कात्रज या कॉरिडॉरवर दोन नवीन स्थानके उभारण्याच्या निर्णयामुळे पुणे शहरातील दक्षिण भागातील नागरिकांसाठी मेट्रो प्रवास अधिक सुलभ होणार असून वाहतूक कोंडी कमी करण्यास मोठी मदत होणार आहे. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे.
(नक्की वाचा- Cabinet Decision: मुंबई, पुणे, ठाणे, नागपूरकरांसाठी खूशखबर! मंत्रिमंडळ बैठकीत मेट्रो-लोकलसाठी मोठे निर्णय)
या प्रकल्पासाठी पुणे महानगरपालिकेचा 227.42 कोटी रुपये, ‘ईआयबी'चे द्वीपक्षीय कर्ज 341.13 कोटी रुपये, तर राज्य करांसाठी राज्य शासनाचे दुय्यम कर्ज 45.75 कोटी रुपये व व्याज रक्कमा राज्य शासनाचे अतिरिक्त बिनव्याजी दुय्यम कर्ज 68.81 कोटी रुपये अशा मिळून एकूण 683.11 कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.
(नक्की वाचा- Cabinet Meeting: फडणवीस सरकारचा धडाका! मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 'हे' १४ मोठे निर्णय)
या निर्णयामुळे पुणे मेट्रो टप्पा-2 चा विस्तार अधिक कार्यक्षम होऊन पुणेकरांना आधुनिक, जलद आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीचा लाभ मोठ्या प्रमाणात मिळणार आहे.