माण, हिंजवडी ते शिवाजीनगर यांना जोडणारा महत्त्वाचा पुणे मेट्रो लाईन 3 प्रकल्पाचे 87 टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम अंतिम टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर, 25 जुलै रोजी माण डेपो ते हिंजवडी फेज 2 दरम्यान मेट्रो लाईन 3 ची दुसरी चाचणी यशस्वीपणे घेण्यात आली. या चाचणीत मेट्रो ट्रेन 40 किलोमीटर प्रति तास वेगाने धावली.
मार्च 2026 डेडलाईन
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, टाटा आणि सीमेन्स समूहाच्या नेतृत्वाखालील पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड यांच्यातील सार्वजनिक-खाजगी भागीदारी मॉडेलअंतर्गत हा प्रकल्प विकसित केला जात आहे. संबंधित प्रकल्पाच्या कामास 25 नोव्हेंबर 2021 रोजी सुरुवात झाली असून, या कामाची मुदत मार्च 2026 पर्यंत आहे.
हा 23.3 किलोमीटर लांबीचा कॉरिडॉर 23 स्थानके आणि विद्यमान मेट्रो मार्गांशी एकसंध इंटरचेंज असणार आहे. पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येसाठी जलद आणि सुरक्षित वाहतुकीसाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पासाठी चार आधुनिक मेट्रो ट्रेनचा सेट आला आहे. प्रत्येक ट्रेनमध्ये तीन पूर्णपणे वातानुकूलित डबे असून, त्यांची एकूण प्रवासी क्षमता अंदाजे एक हजार आहे. या गाड्या ताशी 80 किलोमीटर वेगाने धावणार आहेत.
या मार्गावरील स्टेशन्स खालीलप्रमाणे असतील:
- मेगापॉलिस सर्कल
- एम्बेसी क्वाड्रोन बिजनेस पार्क
- डोहलेर
- इन्फोसिस फेज 2
- विप्रो फेज 2
- पाल इंडिया
- शिवाजी चौक
- हिंजवडी
- वाकड चौक
- बालेवाडी स्टेडियम
- एनआयसीएमएआर
- राम नगर
- लक्ष्मी नगर
- बालेवाडी फाटा
- बाणेर गाव
- बाणेर
- कृषी अनुसंधान
- सकाळ नगर
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
- आरबीआय
- ॲग्रिकल्चर कॉलेज
- शिवाजीनगर
- सिव्हिल कोर्ट
या महत्त्वपूर्ण टप्प्यामुळे पुणे मेट्रो लाईन 3 कार्यान्वित होण्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचली आहे. मेट्रो लाईन 3 चे काम विक्रमी वेळेत पूर्ण होत असून हा मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर पुणे शहरासह संबंधित मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.