Pune MHADA Lottery: पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (Pune MHADA) विविध गृहनिर्माण योजनांमधील घरांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे. नागरिकांकडून कागदपत्रांची पूर्तता आणि इतर कारणास्तव मुदतवाढ देण्याची मागणी होत असल्यामुळे आणि सोडतीला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेऊन, आता अर्जदारांना 21 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज भरता येणार आहेत.
अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ का?
पुणे म्हाडाकडून 11 सप्टेंबर 2025 रोजी विविध योजनांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि अर्ज भरण्याची मूळ अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2025 होती. अनेक नागरिकांना आवश्यक कागदपत्रे जमा करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार आणि लॉटरीला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानुसार अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
म्हाडाचे मुख्य अधिकारी राहूल साकोरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये ही माहिती दिली आहे. अर्ज भरण्याच्या मुदतवाढीमुळे सोडतीसाठीचे नवीन वेळापत्रक लवकरच म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर (Website) उपलब्ध करून दिले जाईल. जाहिरातीतील इतर सर्व नियम व अटी 11 सप्टेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीप्रमाणेच असतील.
( नक्की वाचा : 8th Pay Commission: लॉटरी लागली! 'फिटमेंट फॅक्टर'नुसार पगार दुप्पट होणार? तुमचं वेतन किती वाढेल? इथं करा चेक )
सर्वात 'स्वस्त आणि मस्त' घर: नेमकी किंमत किती?
पुणे म्हाडाच्या या लॉटरीमध्ये सर्वसामान्यांसाठी अतिशय परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध आहेत.
1. 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेत (20% Inclusive Housing Scheme):
या योजनेतील सर्वात स्वस्त घराची अंदाजित किंमत 9,95,900 रुपये ते 12,03,900 रुपये आहे.
योजनेचे ठिकाण: पीएमआरडीए (PMRDA) हद्दीत
योजनेचा संकेत क्रमांक: 813-A/B
योजनेचे नाव: रोहन आनंद फेज 1- 1 RK / 1 BHK - सोमाटणे EWS / LIG.
एकूण फॅल्ट: 64
बांधकाम क्षेत्रफळ (चौ. मी.): 34.61 ते 41.87
चटई क्षेत्रफळ (चौ. मी.): 23.60 ते 29.022. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेत (First Come First Serve Scheme):
- या योजनेत तर 7 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत घर उपलब्ध आहे!
- सर्वात स्वस्त घराची अंदाजित किंमत: 6,95,000 रुपये.
- योजनेचा संकेत क्रमांक: 867-B
- योजनेचे नाव: चाकण - ता. खेड, जि. पुणे सर्व्हे नं. 818 PMAY - 1 RK 1.
- एकूण सदनिका: 3
- बांधकाम क्षेत्रफळ (चौ. मी.): 27.74
- चटई क्षेत्रफळ (चौ. मी.): 23.74
( नक्की वाचा : Pune News : 'नो डॉक्युमेंट, नो माघार!' 'जैन बोर्डिंग'साठी देशभरातील समाज करणार उपोषण )
अर्ज आणि पेमेंटसंबंधी महत्त्वाचे नियम
अनामत रक्कम (Deposit Amount): सोडतीपूर्वी अनामत रक्कम भरल्यानंतर, अर्ज कोणत्याही कारणास्तव रद्द करता येणार नाही.
क्रेडिट कार्ड पेमेंट (Credit Card Payment): अर्जदाराने क्रेडिट कार्डद्वारे अनामत रक्कम भरल्यास आणि ती रक्कम कोणत्याही कारणाने म्हाडाच्या खात्यात जमा न झाल्यास किंवा पोहोचण्यापूर्वी अर्जदाराच्या खात्यात परत वर्ग झाल्यास, अशा अर्जदारांचा अर्ज सोडतीसाठी ग्राह्य धरला जाणार नाही.
अर्ज करण्याची प्रक्रिया आणि माहिती
ऑनलाईन अर्ज नोंदणी: अर्ज करण्यासाठी इच्छुक नागरिकांनी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळाला https://housing.mhada.gov.in येथे भेट द्यावी.
ॲप सुविधा: मोबाईलवरून अर्ज करण्यासाठी MHADA Lottery हे ॲप (App) देखील डाउनलोड करता येईल.
सविस्तर माहिती: ऑनलाईन अर्ज कसा भरावा, अर्ज भरण्याची पद्धत आणि घरांच्या किमती यांसारख्या सविस्तर माहितीसाठी 'म्हाडा लॉटरी 2025' या लिंकवर क्लिक करून अधिकृत जाहिरातीची पीडीएफ (Pune MHADA Lottery 2025 notification pdf) फाईल पहावी.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world