
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला आता पुणे महानगर पालिकेने मोठा दणका दिला आहे. तनिषा भिसे या तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर मंगेशकर रुग्णालयाचे एक एक कारनामे समोर येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे मंगेशकर रुग्णालयाने पुणे महापालिकेचा तब्बल 27 कोटींचा कर थकवला आहे. आता पुणे महापालिकेने रुग्णालय प्रशासनाला एक नोटीस पाठवली आहे. त्यात त्यांनी 2 दिवसात 22 कोटींचा कर भरण्याचा आदेश मंगेशकर रुग्णालयाला दिला आहे. जर हा कर भरला नाही तर जप्तीची कारवाई करण्यात येईल असं ही सांगण्यात आलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुणे मनपाने ही नोटीस लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनच्या व्यवस्थापकांना पाठवली आहे. लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन या मिळकतीच्या थकबाकीबाबत ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यात सदर मिळकतीची सन 2024-2025 अखेर थकबाकी रक्कम रु.27,38,62,874 इतकी आहे. असं या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. शिवाय सन 2016-17 रोजी मिळकतीची करण्यात आलेली कर आकारणी आपणास मान्य नसल्याने पुणे महानगरपालिका विरुद्ध आपण दावा दाखल केलेला होता. असं ही या नोटीसमध्ये म्हटले आहे.
या दाव्याबाबत उच्च न्यायालयाने मिळकत करात समाविष्ट असलेल्या जनरल टॅक्सच्या 50 % रक्कम शिवाय उर्वरित इतर कर भरण्याबाबत कोर्टाने आदेश दिले आहेत. त्यानुसार आपणाकडे सन 2014 ते सन 2025 अखेर 22,06,76,081 इतकी थकबाकी कोर्ट आदेशानुसार दिसून येत आहे, असं ही या नोटीसमध्ये सांगण्यात आलं आहे. थकबाकीबाबत महापालिका आयुक्त यांच्या दालनात बैठक झाली आहे. त्यात अतिरिक्त महापालिका आयुक्त मिळकतीच्या थकबाकीबाबत व कोर्ट आदेशानुसार मिळकतीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कराधान नियम 42 चे तरतुदीनुसार जप्तीची कारवाई करणेबाबत तोंडी आदेश दिले आहेत. असं या नोटीसमध्ये म्हटलं आहे.
त्यामुळे मंगेशकर रुग्णालयाची आता चारही बाजूने कोंडी झाल्याचे चित्र आहे. आता पुढील दोन दिवसात थकबाकी पोटी असलेली 22 कोटींची रक्कम रुग्णालयाला भरावी लागेल. अशा स्थितीत रुग्णालय प्रशासन आणि ट्रस्ट काय निर्णय घेतं या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तनिषा भिसे ही तरुणी प्रसुतीसाठी मंगेशकर रुग्णालयात आली होती. मात्र तिच्या कुटुंबीयांकडे दहा लाखाचे डिपॉझिट मागण्यात आले. त्यावरून तनिषाला अॅडमिट करण्यात उशीर झाला. पुढे तिचा मृत्यू झाला. त्यानंतर मंगेशकर रुग्णालयाबाबत संताप व्यक्त केला जात होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world