सुरज कसबे, प्रतिनिधी
Pune News : पुण्याच्या मावळ तालुक्यातील तळेगाव एमआयडीसीमधील शॅफ्लर इंडिया कंपनीत कार्बन डायऑक्साइड गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. नवलाख उंबरे परिसरातील या नामांकित कंपनीत ही भीषण दुर्घटना घडली. सुरुवातीला या ठिकाणी गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती, मात्र प्रशासकीय तपासणीत ती गॅस गळती असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण तळेगाव औद्योगिक वसाहतीत प्रचंड खळबळ उडाली आहे.
दोन निष्पाप कामगारांचा जागीच अंत
या गॅस गळतीची तीव्रता इतकी भीषण होती की कंपनीत कार्यरत असलेले गणेश उंबरे आणि वैभव थोरात या दोन कामगारांचा विषारी गॅस शरीरात गेल्यामुळे जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अचानक झालेल्या या गळतीमुळे या कामगारांना सुरक्षित ठिकाणी पळून जाण्याची संधीही मिळाली नाही. या दोन्ही कामगारांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून औद्योगिक परिसरात शोककळा पसरली आहे.
( नक्की वाचा : Monsoon 2026: मान्सून आला तरी पेरणीची घाई नको! हवामान विभागाने का दिलाय असा सल्ला? जाणून घ्या सविस्तर )
तिघांची प्रकृती गंभीर, रुग्णालयात उपचार सुरू
या दुर्घटनेत केवळ दोन जणांचा मृत्यू झाला नाही, तर बाजूलाच काम करणारे इतर तीन कामगारही या घातक गॅसच्या प्रभावामुळे गंभीर जखमी झाले आहेत. श्रीकृष्ण साहू, गौरीशंकर शर्मा आणि नरसिंह पाटील अशी या जखमी कामगारांची नावे आहेत. त्यांना कंपनीतील इतर सहकाऱ्यांच्या मदतीने तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या या तिघांचीही प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात विशेष डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, कंपनी प्रशासन आणि एमआयडीसीच्या सुरक्षा यंत्रणेने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पुढील अनर्थ टाळण्यासाठी प्रशासनाकडून संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून गॅस गळती पूर्णपणे रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना केल्या गेल्या. ही गॅस गळती नेमकी यंत्रणेतील तांत्रिक बिघाडामुळे झाली की प्रशासनाच्या एखाद्या मानवी चुकीमुळे घडली, याचा सखोल तपास पोलिसांकडून केला जात आहे. या दुर्घटनेमुळे तळेगाव एमआयडीसीमधील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.