यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Pune News : पुणे जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलं आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे आता दुर्घटनांचं सत्र सुरू झालं आहे. विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या मावळ तालुक्यातील पाटण गावात आज सोमवारी (६ जुलै) पहाटे एका घरावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे.
एफडीआरएफ आणि माहितीनुसार, एकाच घरातील संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकून मृत्युमुखी पडले आहे. नंदू तिकोने (वय 60), अनिता तिकोने (वय 55) आणि माऊली तिकोने (वय 27) अशी मृतांची नावे आहेत. तब्बल 12 तासांच्या अथक प्रयत्नातून बचाव पथकाला तीनही मृतदेह सापडले आहे.
एकाच कुटुंबातील ३ जणांचा ढिगाऱ्याखाली मृत्यू...
पहाटे सव्वा चारच्या सुमारास ढगफुटी सारखा मुसळधार पाऊस पडत होता. अचानक स्फोट झाल्यासारखा मोठा आवाज झाला. पाच घरांवर डोंगरकडा कोसळली. या सर्व घरांमध्ये मिळून जवळपास ३७ जणं होते. एकाच कुटुंबातील ३ जणांचा ढिगाऱ्याखाली मृत्यू झाला आहे. याशिवाय काही जणांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलं आहे. तर तीन जणांचा मृतदेह शोधण्यासाठी जवळपास 12 तासांचं रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं. तीनही मृतदेह लोणावळा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले असून शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेची माहिती मिळताच मावळचे तहसीलदार आणि स्थानिक महसूल विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. मुसळधार पाऊस आणि चिखलाचं साम्राज्य यामुळे सुरुवातीला बचावकार्यात अडथळे येत होते. मात्र स्थानिकांच्या मदतीने प्रशासनाने तातडीने मातीचा ढिगारा उपसण्याचं काम सुरू केलं होतं.
एनडीआरएफचे ३० जवानांचे विशेष पथक दाखल
मातीचा आणि दगडांचा मोठा ढिगारा असल्याने स्थानिक पातळीवरील मदत अपुरी पडत होती. त्यामुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पुणे येथील ५ व्या बटालियनला पाचारण करण्यात आलं आहे. पुणे जिल्हा प्रशासन, ग्रामीण पोलीस, एनडीआरएफचे ३० सदस्यांचे त्यात एक अधिकारी, दोन वरिष्ठ अधिकारी व २७ जवान पथक आवश्यक आपत्ती व्यवस्थापन साहित्यांसह सकाळी ५.५० वाजता घटनास्थळाकडे रवाना झाले आहे. जवळपास 100 हून अधिक स्टाफ या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये सामील होते. जवळपास 300 हून जास्त स्थानिक नागरिकांनी देखील या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मदत केली. बारा तासांच्या आता प्रयत्नानंतर अखेर साडेतीनच्या सुमारास रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आले.