- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकवर वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाई सुरु केली आहे
- गेल्या तीन दिवसांत मिसिंग लिंकवर जवळपास ९५ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली
- पोलीसांनी कारवाई करून ४७ हजार रुपयांहून अधिक दंड वसूल केला आहे
सूरज कसबे
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी आणि घाट रस्ता टाळण्यासाठी मिसिंग लिंक सुरू करण्यात आला आहे. या नव्याने सुरू करण्यात आलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पावर आता वाहतूक पोलिसांनी आपला मोर्चा वळवला आहे. या नवीन मार्गावर वेगाच्या मर्यादा आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांविरोधात महामार्ग पोलिसांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. शिवाय मिसींग लिंकवर मध्येच गाड्या थांबवून फोटोग्राफी करणाऱ्यां विरोधात ही कारवाई केली जात आहे. गेल्या तीन दिवसांत मोठ्या प्रमाणावर दंड वसूल करण्यात आला आहे. त्याची माहिती वाहतूक पोलीसांनी दिली आहे.
बेशिस्त चालकांना वाहतूक पोलीसांनी चांगलाच दणका दिला आहे. गेल्या तीन दिवसांत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जवळपास 95 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये प्रामुख्याने अतिवेग , लेनची शिस्त न पाळणे आणि चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेकिंग करणे, मिसिंग लिंक वर फोटो सेशन करणे अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. या मोहिमेअंतर्गत महामार्ग पोलिसांनी वाहनचालकांकडून 47 हजार रुपयांहून अधिकचा दंड जागीच किंवा ई-चलानाद्वारे वसूल केला आहे. या कारवाईमुळे मिसिंग लिंकवर बेशिस्तीने वागणाऱ्या वाहन चालकांना चाप बसणार आहे.
मिसिंग लिंक हा मार्ग आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असून येथे वाहने ताशी 100 ते 120 किमी वेगाने धावू शकतात. मात्र, अनेक चालक या वेगमर्यादेचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास आले आहे. नवीन मार्ग असल्याने चालकांना वेगाचा अंदाज येत नाही, ज्यामुळे अपघाताची शक्यता बळावते. हेच धोके ओळखून महामार्ग पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या पथकाने या मार्गावर विशेष गस्त वाढवली आहे. अपघात होवू नयेत शिवाय सुरक्षित प्रवास व्हावा यासाठी वाहतूक पोलीसांचा प्रयत्न आहे. त्यामुळे ही मोहीम राबवली जात आहे.
नवीन मार्ग हा प्रवाशांच्या सुविधेसाठी आहे, मात्र त्याचा अर्थ नियमांचे उल्लंघन करणे असा होत नाही. मिसिंग लिंकवर लावलेल्या स्पीड गन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने प्रत्येक हालचालीवर आमचे लक्ष आहे. प्रवाशांनी स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात न घालता नियमांचे पालन करावे, असे आवाहन महामार्ग पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे. पुढील काही दिवस ही कारवाई अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत, त्यामुळे मिसिंग लिंकवरून प्रवास करताना वेगावर नियंत्रण ठेवणेच चालकांच्या हिताचे ठरणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world