Pune News: पुण्यात उघड्यावर शेकोट्या करताय? त्या आधी ही बातमी नक्की वाचा, महापालिकेचा इशारा काय?

पुणे शहरातील सोसायटीच्या परिसरात किंवा रस्त्यावर शेकोट्या पेटवल्या जातात.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

पुण्यासह राज्यात कडाक्याची थंडी वाढलेली आहे. थंडीपासून थोडा दिलासा मिळावा म्हणून अनेक जण उघड्यावर शेकोटी करतात. पण जर पुण्यात कुणी उघड्यावर शेकोटी केली. तसं करताना कोणी आढळला तर त्यावर पुणे महापालिकेच्यावतीने दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. उघड्यावर शेकोट्या पेटवताना लाकूड, कचरा, कोळसा जाळला जातो. यामधून हवा प्रदुषीत होते. याला आळा बसावा म्हणून शेकोटी पेटवल्यास घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत दंडात्मक कारवाई केली जाईल असे आदेश महापालिकेने दिले आहे.

पुणे महापालिकेने दिलेल्या आदेशात पुणे शहरातील अनेक गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक संकुले तसेच निवासी भागात रात्रीच्या वेळी शेकोट्या पेटवू नये असे आदेश देण्यात आले आहे. शेकोटीमुळे पुणे शहरातील हवा प्रदूषीत होत आहे. हवा प्रदूषणामुळे न केवळ वातावरणामध्ये बदल होतात, तर याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर देखील होतो. शेकोट्या पेटवल्यामुळे धूर, कार्बन मोनोऑक्साइड  आणि अन्य हानिकारक वायूंचे उत्सर्जन होते. त्यातून श्वसनावर परिणाम होतो. ज्यामुळे दमा, अस्थमा आणि इतर श्वसन रोगांचा धोका वाढत आहे. त्यामुळे पुणे महापालिकेने दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. 

नक्की वाचा - Pune Tempreture: पुण्यात शिमल्यापेक्षा जास्त थंडी; बुधवारी नाशिक, जळगावसाठी कडाक्याच्या थंडीचा इशारा

शहरातील हवा गुणवत्तेत सुधारणा करणेसाठी केंद्र तसेच राज्य शासनाने हवा प्रदूषणाला नियंत्रित करण्यासाठी विविध कायदे आणि नियम बनवले आहेत. त्यात प्रदूषण नियंत्रण, आणि "घनकचरा व्यवस्थापन नियम आहे. तसेच पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय यांचेकडील राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमची  मार्गदर्शक तत्वे यानुसार उघड्यावर कोळसा, जैविक पदार्थ प्लास्टिक, रबर आणि इतर कचरा जाळण्यास मनाई केली आहे.  

नक्की वाचा - Teeth Cavity: दातातील किडीचा 1 मिनिटात गेम ओव्हर! हे आहेत 4 प्रभावी घरगुती उपाय

पुणे शहरातील सोसायटीच्या परिसरात किंवा रस्त्यावर शेकोट्या पेटवल्या जातात. उघड्यावर कोळसा, जैविक पदार्थ प्लास्टिक,  रबर आणि इतर कचरा जाळून धूर निर्माण केला जातो. कोणत्याही गृहनिर्माण संकुलातील वॉचमन, गफाई कामगार आणि इतर कामगार व्यक्ती, मनपा कर्मचारी किंवा कंत्राटी कामगार किंवा मनपा ठेकेदाराकडील नियुक्त कंत्राटी कामगार या नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास, त्यांच्यावर पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत दंडात्मक कारवाई केली जाईल, असे महापालिकेने  आपल्या आदेशात म्हटलं आहे.

Advertisement