सूरज कसबे, प्रतिनिधी
Alandi Temple Theft: भक्ती आणि श्रद्धेचे माहेरघर असलेल्या आळंदीतून एक अतिशय संतापजनक आणि वारकरी संप्रदायाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. ज्या ठिकाणी लाखो भाविक नतमस्तक होतात, त्याच माऊलींच्या दरबारात एका सेवेकऱ्याने श्रद्धेला काळिमा फासण्याचे कृत्य केले आहे.
काय आहे प्रकरण?
आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरातील दानपेटीतून रोकड लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही चोरी बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीने केलेली नसून, मंदिराच्या सेवेत असलेल्या विशाल बाळू वारूळे या सेवेकऱ्यानेच केली आहे. याप्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या व्यवस्थापकांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
( नक्की वाचा : NEET Paper Leak : पुण्यातील प्रसिद्ध कॉलेजच्या प्राचार्याला बेड्या! 'नीट' च्या परीक्षेत असा झाला पेपरचा सौदा )
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली चोरी
पोलिसांनी दिलेल्या तपासात या चोरीचे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. 12, 13 आणि 16 मे 2026 या तीन दिवसांच्या कालावधीत सायंकाळी दानपेटीतील पैसे कॅशियरकडे जमा करण्याची जबाबदारी आरोपी विशालवर होती. दानपेटीतील पैसे बकेटमध्ये भरत असताना त्याने आजूबाजूच्या लोकांची नजर चुकवून ही रोकड स्वतःच्या पिशवीत टाकली. तीन दिवसांत त्याने एकूण 15000 रुपयांची रोकड चोरली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही फुटेज आणि प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाला आहे.
देवस्थानच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे आळंदीतील स्थानिक नागरिक आणि भाविकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. मंदिरात चोरी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही माऊलींच्या समाधीवरील पैसे चोरीला जाण्याचे प्रकार घडले आहेत, मात्र प्रशासनाने नेहमीच मऊ भूमिका घेतल्याची टीका आता नागरिकांकडून केली जात आहे. दानपेट्यांची मोजणी, सीसीटीव्ही देखरेख आणि कर्मचाऱ्यांवरील नियंत्रणाचा अभाव यामुळेच अशा घटना वारंवार घडत असल्याचे बोलले जात आहे. या प्रकारामुळे संस्थान कमिटीच्या पारदर्शकतेवर आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
( नक्की वाचा : नाशिक TCS प्रकरणात खळबळजनक खुलासा! 1500 पानांच्या चार्जशीटमध्ये धर्मांतराचा संपूर्ण कट उघड )
आळंदी पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, यामागे अजून काही मोठे रॅकेट आहे का किंवा यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत का, याचा शोध घेतला जात आहे.