बेरोजगारांसाठी रोजगार मिळण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. पुण्यात नोकरीची मोठी संधी आहे. त्यासाठी एक रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, पुणे पोलीस आयुक्तालय आणि हरीभाई व्ही देसाई कॉलेज कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा होत आहे. रविवार, 13 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजता हा मेळावा होणार आहे. हरीभाई व्ही देसाई कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शनिवारवाड्याच्या पाठीमागे, बुधवार पेठ, पुणे येथे ‘पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे' आयोजन करण्यात आले आहे.
काही अपरिहार्य प्रशासकीय कारणामुळे मंगळवारी 15 जुलै 2025 रोजी होणारा रोजगार मेळावा हा आता रविवार, 13 जुलैला होणार आहे. याची नोंद घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र.सहायक आयुक्त सागर मोहिते यांनी केले आहे. या मेळाव्यात जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील विविध उद्योजकांनी 2 हजारपेक्षा जास्त रिक्तपदे कळविली आहेत. त्यांच्याकडून ही सर्व रिक्तपदे किमान 10 वी, 12 वी, पदवीधर, कोणत्याही शाखेचा आयटीआय, पदविका, प्रशिक्षणार्थी (ट्रेनी) अशा विविध पात्रताधारक उमेदवारांसाठी आहेत.
जिल्ह्यातील अधिकाधिक नोकरीइच्छुक उमेदवारांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. इच्छुकांनी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन मेळाव्यातील रिक्त पदांना अर्ज करावा. मुलाखतीस येताना उमेदवारांनी सोबत आपल्या सर्व शैक्षणिक कागदपत्राच्या छायांकित प्रती, पासपोर्ट साईज फोटो, आवश्यकतेनुसार अर्जाच्या (रेझ्यूमे) प्रती सोबत आणाव्यात. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुणे येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा. शिवाय 020-26133606 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.