सुरज कसबे, प्रतिनिधी
Pune News : पिंपरी चिंचवड शहरात बिश्नोई गँगने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून गँगचा सदस्य शुभम लोणकर याच्या शूटर्सनी थेट एका नामांकित फर्निचर मॉलवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी दोन पिस्तुलांतून लागोपाठ ५ ते ६ गोळ्या झाडल्या. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
नामांकित मॉलवर गोळीबार...
या गोळीबाराची जबाबदारी बिश्नोई गँगचा सदस्य शुभम लोणकर याने सोशल मीडिया पोस्टद्वारे स्वीकारली आहे. गोळीबार झालेला मॉलचं नाव एजे फर्निचर आहे. या मॉलचे मालक अशोक नैन हे एमडी ड्रग्सच्या तस्करीमध्ये सामील असल्याचा गंभीर आरोप लोणकरने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये केला आहे. हल्लेखोरांनी मॉलच्या दिशेने केलेल्या गोळीबारात मॉलची मुख्य काच फुटली आहे. हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
गोळीबारानंतर लोणकरने सोशल मीडियावर पोस्ट करत, "हा तर केवळ ट्रेलर आहे, यापुढे ऐकले नाही तर थेट डोक्यात गोळी मारली जाईल, असा थेट इशारा मॉल मालकाला दिला आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेज आणि सोशल मीडिया पोस्टच्या आधारे पोलिसांनी बिश्नोई गँगच्या या शूटर्सचा शोध सुरू केला आहे. आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली असून, पोलिस या प्रकरणाचा अत्यंत गांभीर्याने तपास करत आहेत.