अजिंक्य धायगुडे पाटील आणि यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Pune News: शाळेतील छोट्या विद्यार्थ्यांकडून स्वतःचे पाय धुवून घेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महापालिकेच्या शाळेत गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमा दरम्यान घडलेल्या या प्रकरणाचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वसामान्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गुरु-शिष्यांच्या परंपरेच्या नावाखाली लहान मुलांकडून लोकप्रतिनिधीचे पाद्यपूजन करून घेण्याच्या या कृतीवर चौफेर टीका होत असून आता यावरून जोरदार राजकीय वाद पेटला आहे.
शाळेतील तो व्हिडिओ नक्की काय आहे?
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एका महापालिका शाळेतील वर्गात लहान मुले जमलेली दिसत आहेत. तेथे भाजपाच्या नगरसेविका वर्षा साठे एका खुर्चीवर बसलेल्या आहेत आणि त्यांच्या पायाखाली एक मोठे घंगाळ ठेवण्यात आले आहे. दोन लहान मुले त्यांना कागदी मुकुट घालतात ज्यावर 'गुरु' असे लिहिलेले आहे. यानंतर लहान मुले या नगरसेविकेचे पाय धुताना दिसत आहेत.
गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात एका लोकप्रतिनिधीने लहान मुलांकडून अशा प्रकारे पाय धुवून घेतल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.
( नक्की वाचा : NEET Paper Leak: मोबाईल नाही, कॅमेरा नाही... तरीही 'नीट' चा पेपर कसा लीक झाला? CBI तपासात उघड झाली सर्व माहिती )
विरोधकांची कारवाईची मागणी
हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर विरोधी पक्षांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत या संपूर्ण प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे. लहान मुलांचा असा वापर करणे आणि त्यांच्याकडून पाय धुवून घेणे अत्यंत चुकीचे असल्याचे सांगत त्यांनी नगरसेविका वर्षा साठे यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक अध्यक्ष अमोल परदेशी यांनीही या पाद्यपूजनाच्या प्रकारावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. महापालिकेच्या शाळेत लहान मुलांच्या मनावर कसले संस्कार घडवले जात आहेत, असा सवाल उपस्थित करत त्यांनी या घटनेचा निषेध केला आहे.
आरोपांवर वर्षा साठे यांचे स्पष्टीकरण
या संपूर्ण वादावर आणि उठलेल्या टीकेवर भाजपाच्या नगरसेविका वर्षा साठे यांनी आपली बाजू मांडली आहे. आपल्याला शाळेत गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते, असे त्यांनी स्पष्ट केले. असा कोणताही प्रकार घडवून आणण्याचा किंवा लहान मुलांकडून पाद्यपूजन करून घेण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता, असा दावा त्यांनी या प्रकरणी केला आहे.
दरम्यान, या पाद्यपूजनाच्या प्रकरणावरून पुण्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. लहान मुलांकडून स्वतःचे पाय धुवून घेणाऱ्या आपल्या पक्षाच्या नगरसेविकेवर भाजप आता काय भूमिका घेणार आणि त्यांच्यावर काही कारवाई करणार का, याकडे संपूर्ण पुण्याचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world