सुरज कसबे, प्रतिनिधी
Pune News : राज्यातील आयटी शहर असलेल्या पुण्यातून आता एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. हिंजवडीतील आयटी पार्कमधील एका मोठ्या प्रसिद्ध कंपनीत काम करणाऱ्या 48 वर्षांच्या महिला कर्मचाऱ्याला कॉर्पोरेट जिहादचा छळ सहन करावा लागला आहे.
एखाद्या प्रोफेशनल कंपनीत काम करताना केवळ कामावर लक्ष दिले जाईल अशी अपेक्षा असते, मात्र येथे या महिलेला चक्क धर्मपरिवर्तन आणि लग्नासाठी धमकावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा दबाव धुडकावून लावल्यामुळे या महिलेला इतका मानसिक त्रास दिला गेला की, शेवटी तिला आपल्या हक्काच्या नोकरीचा राजीनामा द्यावा लागला आहे.
काय आहे प्रकरण?
पीडित महिलेने केलेल्या खुलाशानुसार, ती हिंजवडी येथील एका प्रसिद्ध कंपनीत कार्यरत असताना तिथल्याच एका संबंधित महिलेने तिच्यावर धर्मांतर करण्याचा आणि लग्न करण्याचा तगादा लावला होता. सुरुवातीला याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न झाला, मात्र हा दबाव वाढतच गेला.
पीडित महिलेने या मागण्यांना स्पष्टपणे नकार दिला, तेव्हापासून तिचे जगणे कठीण करण्यात आले. कंपनीत तिला सातत्याने टार्गेट केले गेले आणि कामाच्या ठिकाणी असा काही माहोल तयार करण्यात आला की तिला दररोज मानसिक छळाचा सामना करावा लागला. या सततच्या त्रासामुळे तिला नोकरी सोडावी लागली.
( नक्की वाचा : नाशिक TCS प्रकरणात खळबळजनक खुलासा! 1500 पानांच्या चार्जशीटमध्ये धर्मांतराचा संपूर्ण कट उघड )
हिंदु जनजागृती समिती आक्रमक
या प्रकरणाने आता मोठे वळण घेतले असून पुण्यात पार पडलेल्या एका पत्रकार परिषदेत या सर्व धक्कादायक बाबी उघड करण्यात आल्या आहेत. हिंदू जनजागृती समितीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून याला कॉर्पोरेट जिहाद असे नाव दिले आहे.
नाशिकमधील टीसीएस कंपनीत देखील अशाच प्रकारचे काहीसे प्रकरण गाजले होते आणि तिथे नुकतेच आरोपपत्र दाखल झाले आहे. आता पुण्यातही असाच पॅटर्न सक्रिय आहे का, अशी शंका उपस्थित केली जात आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी आणि यामागील नेमके सूत्रधार कोण आहेत याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
( नक्की वाचा : JPMorgan :'माझ्यासोबत झोपला नाहीस तर संपवून टाकेन'; बड्या कंपनीच्या महिला बॉसच्या धमकीने भारतीय तरुण उद्ध्वस्त )
आयटी क्षेत्रातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
देशाच्या कानाकोपऱ्यातून तरुण-तरुणी पुण्यात नोकरीसाठी येतात. आयटी कंपन्यांमध्ये शिस्त आणि सुरक्षितता असल्याचे मानले जाते. मात्र, अशा प्रकारे वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करून आणि धर्माच्या नावाने एखाद्या कर्मचाऱ्याला त्रास देऊन त्याला नोकरी सोडण्यास भाग पाडले जात असेल, तर ही बाब अत्यंत चिंताजनक आहे.
हिंजवडीतील या घटनेमुळे कॉर्पोरेट जगतातील अंतर्गत सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा तपास आता कोणत्या दिशेने जाणार आणि संबंधित कंपनी यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world